‘स्वाभिमानी’चे राहुरीच्या प्रसाद शुगरवर काटा बंद आंदोलन पंचवीसशे रुपये पहिली उचल जाहीर करण्याची व्यवस्थापनाकडे मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
ऊस उत्पादकांना एफआरपी अधिक 300 रुपये याप्रमाणे कमीत कमी पंचवीसशे रुपये पहिली उचल जाहीर करावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राहुरीच्या प्रसाद शुगर कारखान्यावर सोमवारी (ता.22) काटा बंद आंदोलन करण्यात आले.

कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक व इतर पदाधिकारी बाहेर असल्याने आम्हाला चार-पाच दिवस वेळ द्या, योग्य तो निर्णय घेऊ असे लेखी आ’येासन शेतकी अधिकारी घुगरकर यांच्यावतीने आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. सोमवारी सकाळी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत प्रसाद शुगर कारखान्यावर गेल व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी अधिकार्यांना बोलवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी करून काटा बंद करून कारखाना व शेतकर्याचे नुकसान करण्यात आम्हाला स्वारस्य नसल्याचे व्यवस्थापनास सांगण्यात आले. परंतु कार्यकारी संचालक व जबाबदार अधिकारी कारखान्यात हजर नसल्याने आंदोलनकर्त्यांनी जवळपास दोन तास काट्यावर बसून ठिय्या मांडला.

यानंतर दूरध्वनीवरून वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर चार ते पाच दिवस वेळ द्या, शेतकरी व संघटनेच्या मागणीप्रमाणे योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याने आंदोलन मागे घेऊन काटा पूर्ववत सुरू करू देण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, सतीश पवार, पोपट धुमाळ, निशीकांत सगळे, प्रमोद पवार, बद्रुद्दीन इनामदार, बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे, सचिन म्हसे, किशोर वराळे, सचिन पवळे, आनंद माने, सचिन पवार, नितीन मोरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
