मसालाकिंग डॉ.धनंजय दातारांनी राखली भारताची प्रतिष्ठा…
मसालाकिंग डॉ.धनंजय दातारांनी राखली भारताची प्रतिष्ठा…
सौदी अरेबियात अडकलेल्या 700 भारतीय कामगारांची केली सुटका
नायक वृत्तसेवा, नगर
मसालाकिंग डॉ.धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित ‘अल अदील ट्रेडिंग’ समूहाने सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेले चार महिने तुरूंगवासात अडकलेल्या जवळपास 700 भारतीय कामगारांची सुटका केली. वाहतूक आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी डॉ.दातार व त्यांच्या सहकार्यांनी प्रयत्नांची शर्थ केली असून भारताची प्रतिष्ठाही राखली आहे. मुक्त झालेले हे कामगार नुकतेच मायदेशी परतले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आणि त्यांनी डॉ.दातार हे खरोखरच अल अदील (भला माणूस) आहेत अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात कामासाठी गेलेले भारतीय कामगार कोरोना व टाळेबंदीमुळे तेथेच अडकून पडले होते. काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती, काहींच्या नोकर्या गेल्याने ते अन्यत्र मिळेल ते काम करुन गुजराण करत होते. तर काहीजण निर्धन झाल्यामुळे दुसरा काही पर्याय नसल्याने अक्षरशः भीक मागत होते. या गोष्टी स्थानिक कायद्याला धरुन नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात (डिटेन्शन सेंटर) केली होती. तुरूंगवासातून सुटका होऊन मायदेशी परतण्यासाठी हे कामगार व्याकुळ झाले होते. याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमांत आले होते. दरम्यान, डॉ.धनंजय दातार यांना हे समजताच त्यांचे मन हेलावले. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका अशा शेजारी देशांनी त्यांच्या कामगारांना लगेचच घरी नेण्याची व्यवस्था केली. पण भारतीय कामगार मात्र चार महिने निष्कारण तुरूंगात अडकून पडल्याचे समजताच ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी देशबांधवांच्या मदतीला धावून जाण्याचा निश्चय केला. संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया हे वेगवेगळे देश असल्याने एका देशातून दुसरीकडे पाठपुरावा करण्याचे काम तितकेसे सोपे नव्हते. डॉ.दातार यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत (कॉन्सुलेट) जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला आणि स्थानिक प्रशासनाने मानवतावादी भूमिकेतून या निरपराध कामगारांना तुरूंगवासातून सोडल्यास सर्वांना भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली. सौदी अरेबिया प्रशासनाचे सहकार्य, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रयत्न आणि डॉ.दातार यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यामुळे हे कामगार नुकतेच मुक्त झाले.

