गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मुसळधारा! म्हाळुंगी व आढळेला महापूर; संगमनेरच्या नदीकाठावरील नागरिकांना हलवले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारी सायंकाळी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळल्याने सार्वजनिक गणेश मंडळांसह नागरीकांची एकच धावपळ उडाली. सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर कोसळल्याने संगमनेर तालुक्यातून वाहणार्या म्हाळुंगी व आढळा या दोन्ही नद्यांना चालू हंगामात पहिल्यांदा महापूर आला आहे. त्यामुळे संगमनेरच्या म्हाळुंगी नदीकाठावरील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पावसाने शहरातील रस्त्यारस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहीले तर काही सार्वजनिक गणेश मंडळातही पावसाचे पाणी शिरल्याने कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळाली. एकीकडे मुसळधारा कोसळत असताना दुसरीकडे तरुणाईचा उत्साह कोठेही कमी झाल्याचे दिसले नाही.
गेल्या काही दिवसांपासून पाणलोटासह संपूर्ण जिल्ह्यातून गायब झालेल्या पावसाने गणेशोत्सवाचा मुहूर्त धरीत बुधवारी रात्री आठच्या सुमारास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हजेरी लावली. अकोले तालुक्याच्या उत्तरेत असलेल्या आढळा व भोजापूर या दोन्ही जलाशयाच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्याने आणि त्यातच ही दोन्ही जलाशये यापूर्वीच् तुडूंब असल्याने धरणात येणारे सर्व पाणी नदीपात्रातून वाहण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम गेल्या दोन महिन्यात जोरदार पाऊस होवूनही जेमतेम वाहणार्या म्हाळुंगी आणि आढळा या नद्यांना जोश चढला असून या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे. म्हाळुंगी नदीचा प्रवाह अधिक असल्याने संगमनेरनजीकच्या राजापूर पुलावर पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून नदीपात्रात घर करुन राहणार्या नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
बुधवारी सायंकाळनंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरु झालेल्या पावसाने उत्तर नगर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपासून आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक 81.8 मि.मी पाऊस श्रीरामपूर तालुक्यात नोंदविला गेला आहे. त्या खोलोखाल अकोले 79.2 मि.मी, राहाता 69.7 मि.मी, कोपरगाव 63.2 मि.मी, संगमनेर 58.9 मि.मी, पारनेर 42.7 मि.मी, श्रीगोंदा 40.2 मि.मी, नेवासा 28.4 मि.मी, राहुरी 27.5 मि.मी, कर्जत 21.2 मि.मी, नगर 20.8 मि.मी, पाथर्डी 18.2 व सर्वाधीक कमी शेवगाव तालुक्यात 7.3 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्याच्या दहा महसुली मंडलातही बुधवारी जोरदार पाऊस कोसळला. त्यात सर्वाधिक 115.8 मि.मी पाऊस एकट्या साकूर महसुल क्षेत्रात पडला आहे. त्या खालोखाल धांदरफळ 89.5 मि.मी, घारगाव व डोळासणे प्रत्येकी 54.5 मि.मी, आश्वी व पिंपरणे प्रत्येकी 53.5 मि.मी, समनापूर 47.3 मि.मी, शिबलापूर 45.8 मि.मी, तळेगाव 39.3 मि.मी व संगमनेर 35 मि.मी अशी नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांत तालुक्यात सरासरी 58.9 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.