नासक्या नारळावरुन संगमनेर खुर्दमध्ये दोनगटांत तुंबळ! दोन्हीकडून परस्परविरोधी तक्रारी; घटनेला गावकीच्या राजकारणाचा गंध..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
खासदार निधीतून मिळालेल्या हायमास्ट लॅम्पच्या उद्घाटनात वापरलेला नारळ नासका निघाल्याचे निमित्त करुन संगमनेर खुर्दमधील विरोधी गटाच्या चौघांनी उपसरपंचाला शिवीगाळ आणि मारहाण करीत धमक्या भरल्या. त्यावरुन दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात यथेच्छ हाणामार्‍या केल्या. या घटनेत उपसरंपच गणेश शिंदे यांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणी सोमवारी उपसरपंच शिंदे यांच्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी दुसर्‍या बाजूच्या सचिन पावबाके या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्यासह चौघांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. घडल्या प्रकाराला गावकीच्या राजकारणाचा गंध असून यापूर्वीही दोन्ही बाजूने एकमेकांवर शाब्दीक हल्ले झाल्याचे बोलले जाते. यावेळी मात्र ग्रामपंचायतीचा वाद थेट हाणामर्‍यापर्यंत पोहोचल्याने तालुक्यात त्याची चर्चाही सुरु झाली आहे.


याबाबत संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी सोमवारी (ता.10) रात्री उशिराने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार घटनेच्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदार गावातील मारुती मंदिराजवळ असताना सचिन पावबाके व संकेत खुळे हे दोघे त्यांच्याजवळ आले. यावेळी खुळे याने ‘सरपंच मॅडमने नारळ फोडला तो नासका निघाला..’ असे म्हणतं त्यांना टोमणा हाणला. तर, पावबाके याने ‘तुम्ही सगळेच नासके आहात..’ असं खाजवत वादाला तोंड फोडलं. या नंतर शिंदे यांनी पावबाकेला ‘तू जरा नीट बोल..’ अशी समज दिली असता त्या दोघांनीही त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.


यानंतरकाही वेळाने तेथे आलेल्या शरद पावबाके याने उपसरंपच शिंदे यांच्यावर धावून जात त्यांना शिवीगाळ व चापटीने मारहाण केली. तर, महेश सातपुतेने शिवीगाळ करीत ‘तू परत ग्रामपंचायत कार्यालयात कसा येतोस हे बघतो..’ असे म्हणतं त्यांना धमकी भरली व धक्काबुक्की केली. अशा आशयाच्या त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी संगमनेर खुर्दमधील सचिन पावबाके, संकेत खुळे, शरद पावबाके व महेश सातपुते या चौघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 115, 352, 351 (2), 324 (4) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर मंगळवारी (ता.11) रात्री उशिराने या प्रकरणातील दुसर्‍या गटात असलेल्या सचिन शरद पावबाके यांनी रुग्णालयात दाखल असताना पोलिसांना दिलेल्या जवाबावरुनही विरोधी तक्रार दाखल झाली आहे.


आपल्या जवाबात पावबाके यांनी गेल्यावर्षीच्या शिवजयंती उत्सवाचा उल्लेख करुन त्यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला म्हणून उपसरपंच गणेश शिंदे यांनी तू कोणताही पदाधिकारी नसताना हार कसा घालतोस? असे म्हणतं त्याला दरडावल्याचा दाखला दिला आहे. तेव्हा तक्रारदाराने आपण गावातील रहिवाशी असल्याने आपल्याला तो अधिकार असल्याचे प्रत्यूत्तर दिल्याने उपसरपंचांना त्याचा राग आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी (ता.10) दुपारी सव्वादोनच्या सुमारास माजी सरपंच गुलाब देशमुख यांनी फोन करुन पावबाके याला शिबलीबाबा दर्गा परिसरात खासदार निधीतून हायमास्ट लॅम्प बसवल्याची माहिती दिली. त्यासाठी त्यांनी तेथे येण्यास सांगितले.


त्यानुसार पावबाके त्यांचे मित्र संकेत खुळे यांच्यासह शिबलीबाबाच्या दर्ग्याजवळ गेले असता तेथे आधीपासूनच असलेल्या उपसरपंच गणेश शिंदे यांनी त्यांना थांबवून ‘तुम्ही इथे कशासाठी आला आहात?, तुमचा काय संबंध?’ असे सवाल केले. त्यावर आम्ही गावचे नागरिक असल्याचे त्यांनी सांगताच शिंदे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी राजू शिंदे, चेतन शिंदे व अभिजीत उर्फ सोनु शिंदे हे तिघेही तेथे आले. उपसरपंच शिंदे यांनी पाणी सोडण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी रॉड घेवून पावबाके याच्या उजव्या हातावर मारला.

राजू शिंदे याने डाव्या डोळ्यावर बुक्का मारला. चेतन व सोनु शिंदे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हाणामारीत जखमी झाल्याने आपण खासगी रुग्णालयात दाखल झाल्याचा जवाब त्यांनी नोंदवला. त्यावरुन शहर पोलिसांनी संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे यांच्यासह राजू शिंदे, चेतन शिंदे व अभिजीत उर्फ सोनु शिंदे यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 118 (1), 115, 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने ग्रामपंचायतीमधील अंतर्गत वाद आता थेट चव्हाट्यावर आले आहेत.

Visits: 62 Today: 2 Total: 313327

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *