‘जीवनसाथी’ डॉट कॉमवर लग्नाची मागणी घालून पोलिसानेच केला घटस्फोटीतेवर अत्याचार! घारगाव पोलीस ठाण्यातील कर्मचार्यासह आळेफाटा येथील डॉक्टर व अन्य दोघांवर गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोलापूर जिल्ह्यात राहणार्या घटस्फोटीत महिलेशी ‘जीवनसाथी डॉट. कॉम’ या लग्नगाठी जुळविणार्या संकेतस्थळावरुन लग्नाची मागणी घालीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार, तिला व तिच्या दहा वर्षीय मुलीला मारहाण, दमदाटी करणे व बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी घारगाव पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई सुनील रत्नपारखीसह आळेफाटा येथील डॉक्टर आणि अकोल्यातील एका महिलेसह दोघांवर अत्याचार, अॅट्रोसीटी, बेकायदा गर्भपात व पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताने पोलीस वुर्तळासह वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुळच्या सोलापूर जिल्ह्यात राहणार्या एका 33 वर्षीय घटस्फोटीत तरुणीने आपल्या पुनर्विवाहासाठी ऑनलाईन लग्नगाठी जुळविणार्या ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंद केली होती. याचवर्षी 11 जानेवारी रोजी घारगाव पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सुनील यशवंत रत्नपारखी या कर्मचार्याची त्याच संकेतस्थळावरील नोंदीवरुन त्या महिलेशी ओळख झाली. संकेतस्थळावरील मोबाईल क्रमांकाचा आधार घेवून संबंधित कर्मचार्याने त्या महिलेशी संवाद साधला. त्यावेळी त्या महिलेने आपणास दहा वर्षांची मुलगी असून तिचा सांभाळ करणार असाल तरच लग्न करण्याची अट घातली.
संबंधित पोलीस शिपायाने आपणही घटस्फोटीत असून आपणास दोन मुली आहेत व त्या दोघीही आपल्यासोबतच राहतात असे त्या महिलेला सांगीतले. त्यावरुन त्या दोघांचीही लग्नावरुन परस्पर सहमती झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या कर्मचार्याने थेट त्या महिलेचे सोलापूर जिल्ह्यातील गाव गाठले. त्यावेळी त्याने सदर महिलेच्या आई व भावांशी चर्चा करुन लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दिवसापासून तो मोबाईलद्वारे दररोज त्या महिलेच्या संपर्कात राहीला. या दरम्यान फेब्रुवारीमध्ये एक दिवस त्याने आपले आपल्या घटस्फोटीत बायकोशी भांडण झाले असून माझ्या दोन्ही मुलीला ती घेवून गेली असल्याचे सांगीतले, व त्यानंतर काही दिवसांनी मी एक मुलगी सोबत आणली असून तशी नोटरी केल्याचेही त्याने त्या महिलेला कळविले. माझ्या मुलीची परीक्षा असल्याने त्याने तिला घारगावला येण्याची गळ घातली.
त्यानुसार 17 फेब्रुवाररोजी सदर महिला सोलापूरहून शिर्डीत आली व संबंधित कर्मचार्याने तिला शिर्डीतून थेट घारगावला आणले. त्या दिवशी त्या कर्मचार्याला रात्रपाळी असल्याने त्याने त्या महिलेला तिच्या व स्वतःच्या मुलीसह आपल्या खोलीवर ठेवले व तो निघून गेला. मात्र मध्यरात्री तो परत घरी आला तेव्हा दोन्ही मुली झोपलेल्या होत्या. त्या संधीचा फायदा घेवून त्याने त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. मात्र घारगाव तिच्यासाठी नवीन असल्याने व त्यातच अत्याचार करणारा पोलीस कर्मचरी असल्याने ती रात्रभर तशीच राहीली. दुसर्या दिवशी त्या महिलेच्या आईने फोन केला असता त्याने आपल्या मुलीच्या परीक्षेचे कारण पुढे करुन काही दिवस तिला घारगावला राहू द्यावे, आम्ही लग्न करणारच असल्याचे सांगीतले.
त्यानंतर त्या महिलेने लग्न कधी करणार याबाबत विचारणा केली असता 19 फेब्रुवारीरोजी त्याने मंगळसूत्र व जोडवे आणून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. नंतर चार दिवसांनी सदर महिला दोन्ही मुलींना घेवून सोलापूर जिल्ह्यातील आपल्या गावी गेली व काही दिवस थांबून रत्नपारखी याच्या मुलीची परीक्षा असल्याने तिला घेवून पुन्हा घारगावला आली. त्या दरम्यान त्याने वेळोवेळी लग्नाचे अमिष दाखवित तिच्यावर अत्याचाराचा सिलसिला सुरुच ठेवला. त्यातून तिला गर्भधारणा झाली, ही गोष्ट समजताच त्याने गर्भपात करण्याचा आग्रह सुरु केला. मात्र सदर महिला त्याच्या विरोधात ठाम असल्याने अखेर त्या पोलीस कर्मचार्याचे नातेवाईक असलेले अकोले तालुक्यातील अमोल कर्जुले व त्याची आई यांनी घारगावात येवून गर्भपातासाठी तिच्यावर दबाव आणला. यातून त्या महिलेच्या दहा वर्षीय मुलीलाही मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.
अखेर जबरदस्तीने तिला आळे येथील डॉ.व्ही.जी.मेहेर यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व बळजोरीने तिचा बेकायदा गर्भपात केला गेला. त्यामुळे आपण फसल्याची जाणीव तिला झाली आणि तिने अखेर घारगाव पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी स्वतः घारगाव पोलीस ठाण्यात उपस्थित राहुन त्या महिलेची कैफीयत ऐकली व त्यानुसार संशयित आरोपी पोलीस शिपाई सुनील यशवंत रत्नपारखी, आळे येथील निरामय रुग्णालयाचे डॉक्टर व्ही.जी.मेहेर, त्या पोलीस शिपायाचे नातेवाईक अमोल कर्जुले व त्याची आई अशा चौघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भा.द.वी 376, 376(2)(एन), 313, 354, 354 (ए), 323, 504, 506, 34 प्रमाणे व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने पोलीस दलासह वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
अवैध व्यावसायिकांशी संबंध, लाचखोरी यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलीस दल सतत चर्चेत राहीले आहे. आता पोलीस कर्मचार्यानेच ‘जीवनसाथी डॉट.कॉम’चा आधार घेवून थेट सोलापूरच्या घटस्फोटीतेला घारगावात आणून गेल्या आठ महिन्यांपासून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याने व बेळजोरीने तिचा बेकायदा गर्भपात घडवून आणल्याने जिल्हा पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तक्रार येताच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी गुन्हा दाखल केल्याने समाधानही व्यक्त होत आहे.