संगमनेर तालुक्यात बेकायदा व बनावट मद्याचा सुळसुळाट! आम्लेटच्या गाड्यांसह ढाबे बनले अड्डे; मद्यशौकिनांच्या जीवाशी उघड खेळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्यदिनी संगमनेरातील बेकायदा दारुचा राजरोस धंदा उघडा पडल्यानंतर आता या गोरखधंद्याची जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील व्याप्ती चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत संगमनेर तालुक्यातील दोघा बिअरबार चालकांना अटक झाल्याने परवानाधारक व्यक्तींकडूनच अशाप्रकारचे उद्योग सुरु असल्याचेही समोर आले आहे. याशिवाय संगमनेरात धुळे व श्रीरामपूर येथून बनावट दारुचा पुरवठा होत असल्याचीही चर्चा सुरु असून या माध्यमातून तालुक्यातील असंख्य ढाबे व शहराच्या बहुतेक सर्वच मुख्य रस्त्यांवर असलेल्या आम्लेट व चायनीज व्यंजनांच्या हातगाड्यांवर ती सहज उपलब्ध होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने संगमनेर तालुक्यातील मद्यशौकिनांच्या जीवाशी उघड खेळ सुरु असल्याचे धक्कादायक वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे.
जिल्ह्यात पुढारलेल्या तालुक्यांमध्ये अग्रणी असलेल्या संगमनेर तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे. मुळा, प्रवरा, म्हाळुंगी व आढळा या नद्यांच्या पाण्यामुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता आल्याने येथील बाजारपेठेने जिल्हा मुख्यालयाच्या तोडीचे स्थान पटकाविले आहे. साहजिकच आर्थिक संपन्न असणार्या शहरांप्रमाणे संगमनेरातही शौकिनांच्या गरजा पूर्ण करणारी विविध कायदेशीर आणि बेकायदेशीर ठिकाणंही या माध्यमातून उभी राहिली आहे. मात्र अलिकडच्या काळात विनासायस अधिकचा पैसा मिळवण्याची आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता असलेल्या मंडळींचाही आता अशा उद्योगात शिरकाव झाल्याने संगमनेर शहरासह तालुक्यातून जाणार्या जवळजवळ सर्वच मुख्य रस्त्यांवर नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी रायतेवाडी येथील चैतन्य सुभाष मंडलिक या अधिकृत बिअरबार चालकाच्या घरावर छापा घालून 14 लाख 28 हजार 950 रुपयांची दमण येथील बेकायदा दारु जप्त केली होती. या कारवाईत त्याच्यासह सुरेश मनोज कालडा या अन्य एका परमिट रुम चालकावरही गुन्हा दाखल करुन या दोघांनाही अटक करण्यात आली. यातील चैतन्य मंडलिक ही व्यक्ती ज्यावेळी त्याच्याकडे बिअरबारचा परवाना नव्हता तेव्हापासून राज्यात विक्री करण्यास मनाई असलेली दमण व गोवा येथील दारु संगमनेरात बेकायदा पद्धतीने आणून त्याची विक्री करीत असत. त्याच्यावर यापूर्वीही वेळोवेळी छापे पडले असून अनेकवेळा पोलीस दप्तरी गुन्ह्यांची नोंदही झालेली आहे.
गोवा व दमण येथे मिळणारी दारु देशात अन्य ठिकाणी विक्री करता येत नाही. या दोन्ही राज्यातील परिस्थितीनुसार तेथे तयार होणार्या दारुमध्ये अल्कोहोलचे प्रमाण महाराष्ट्रात मिळणार्या दारुपेक्षा खुप कमी असते. त्यातही त्या राज्यांमध्ये मिळणारी दारु महाराष्ट्रापेक्षा निम्म्या किंमतीत मिळत असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात बकायदा पद्धतीने दारु आणून महाराष्ट्रात विक्री होणार्या दारुच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरुन त्याची विक्री केली जाते. या माध्यमातून मद्य शौकीनांची एकाप्रकारे आर्थिक फसवणूकच होते. मात्र गेली कित्येक वर्ष सुरु असलेला हा गोरखधंदा आजही बिनबोभाटपणे सुरु असल्याने त्याला राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे संपूर्ण सहकार्य असतेच हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
हा झाला बेकायदा दारु कायदेशीर करुन विकण्याचा प्रकार मात्र संगमनेरात याशिवायही विविध प्रकारची दारु उपलब्ध असून त्यात स्पिरीट अथवा रसायनांचा वापर करुन तयार केली जाणारी बनावट दारुही मोठ्या प्रमाणात विकली जाते. त्यासाठी शहरालगतच्या फास्टफूड, अंडा-आम्लेट व चायनीज व्यंजनांच्या हातगाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशा ठिकाणांना कोणत्याही प्रकारचे कर नसल्याने हा गोरख धंदा इतक्या मोठ्या प्रमाणात फोफावला आहे की शहराच्या आसपासच्या मार्गावर असलेल्या बहुतेक सर्वच अशा हातगाड्यांवर आता बेकायदा आणि बनावट पद्धतीच्या दारुची अगदी राजरोसपणे विक्री केली जाते. या ठिकाणी होणारा दारुचा पुरवठा श्रीरामपूर व धुळे येथून होत असल्याचीही चर्चा आहे. अर्थात या सर्व गोष्टी उत्पादन शुल्क व पोलिसांना माहिती नाही असे म्हणता येणार नाही, त्यांना टाळून अशा व्यवसायाची कोणी कल्पनाही करु शकत नाही हे महत्त्वाचे.
बेकायदा दारुतून शारीरिक हानी होण्याची शक्यता नसते, मात्र त्यातून शौकीनांची आर्थिक फसवणूक होते. मात्र बनावट दारु ही कोणत्याही शाश्वत तंत्राशिवाय केवळ रसायनांच्या मिश्रणातून तयार केली जात असल्याने एखाद्यावेळी तयार करणार्याकडून एखाद्या रसायनाची मात्र वाढल्यास त्याचे गंभीर दुष्परिणामही देशभरातून वेळोवेळी समोर आले आहेत. त्यामुळे उत्पादन शुल्क व पोलीस या दोन्ही विभागांनी सेवेत समाविष्ट होताना घेतलेली शपथ आठवून नागरिकांच्या कल्याणासाठी काम करण्याची गरज आहे, मात्र दुर्दैवाने आपल्या देशात बेकायदेशीर वागण्यात यंत्रणाच आघाडीवर असल्याने दुर्घटना घडल्यानंतर दोन दिवसांचा आव आणून सगळं काही सुरळीत होण्याची परंपरा आजही अबाधित आहे.
संगमनेर शहरात एकूण 55 तर तालुक्यात मिळून एकूण 110 च्या आसपास अधिकृत बिअरबार आहेत. या माध्यमातून विक्री होणार्या मद्यातून राज्य सरकारला महसुलाची प्राप्ती होते व त्यातून राज्यातील विकासाची कामे केली जातात. मात्र तालुक्यातील अनेक ढाबे आणि रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून त्याभोवती हिरवे-लाल कापडं बांधून फास्टफूडच्या नावाखाली तयार झालेले छोटे-छोटे बेकायदा बार मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ठरत असून राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी आपली शपथ आठवून मानवी कल्याणाचा विचार करण्याची गरज यातून निर्माण झाली आहे.