बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना? चुलतभावानेच अत्याचार केल्याच्या तक्रारीवरुन त्याला अटक, मात्र ‘सत्याचा’ शोध सुरु
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय संस्कृतीत मानवी नात्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. बहिण-भावाच्या नात्याला तर राखीच्या एका धाग्यातून पवित्रतेची घट्ट विणच देण्यात आली आहे. जन्मभर आपल्या भगिनीचे रक्षण करण्याच्या जबाबदारीची जाणीवही दरवर्षीच्या रक्षाबंधनातून करुन देण्याची आपली प्रथा आहे. मात्र या प्रथेलाच हरताळ फासतांना बहिण-भावाच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासणारी घटना संगमनेर शहरात समोर आली आहे. या घृणास्पद कृत्यातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहीली असून या दृष्कृत्याला जबाबदार असणार्या त्या मुलीच्या सख्ख्या चुलत भावाविरोधात अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरातील एका इमारतीमध्ये दोन भावांचे कुटुंब रहाते. त्यातील एकाचा हातगाडीवरील खाद्य पदार्थांचा व्यवसाय आहे. ते त्यांची पत्नी, मुलगा व मुलीसह राहतात, तर त्यांचा भाऊ पत्नी व दोन मुलांसह त्याच इमारतीत राहण्यास आहे. साधारण तीन महिन्यांपूर्वी पहिल्या कुटुंबातील मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्या चुलतभावाने आपल्या बहिणीशीच लगट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या मुलीने त्यास प्रतिसाद न देता सदरची बाब घरी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या चुलत भावाने तसे केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला त्यापासून परावृत्त केले.
त्यानंतर सुमारे तीन महिन्यांपूर्वी सदर तरुणाने इमारतीत ‘ती’ मुलगी सोडून अन्य कोणीही नसल्याचे पाहून आपल्याच बहिणीवर अत्याचार केला व सदरचा प्रकार कोणास सांगीतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कोठेही वाच्चता केली नाही. त्याचा त्या तरुणाने वेळोवेळी फायदा घेतला व गेली तीन महिने तो तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत राहीला व कोणास सांगीतल्यास जीव मारण्याची धमकीही देवू लागला. मात्र म्हणतात ना की गैरकृत्य फारकाळ लपवून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे या प्रकरणाचं बिंगही फुटलं.
गेल्या पंधरवड्यात त्या सतरा वर्षीय तरुणीचे पोटं दुखु लागल्याने तिला शहरातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते. तेथे संबंधित डॉक्टरांनी टाईफाईडचे निदान केल्याने तिच्यावर त्याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर घरी परतल्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी पुन्हा तिचे पोट दुखु लागल्याने तिच्या पालकांनी तिला पुन्हा त्याच रुग्णालयात नेले असता त्यांनी तपासणी करुन त्या मुलीला दुसर्या एका खासगी रुग्णालयात जाण्यास सांगीतले. त्यानुसार त्या मुलीला दुसर्या दवाखान्यात नेले असता त्यांनी तपासणीअंती तिला लोणीच्या प्रवरा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
लोणीत पोहोचल्यावर तेथील डॉक्टरांनी सदरची तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याचा निर्वाळा दिल्याने त्या तरुणीचे पालक हादरले. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्या पालकांनी याबाबत संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी थेट लोणीच्या प्रवरा रुग्णालयात जावून त्या मुलीचा जवाब नोंदविला व सदर तरुणा विरोधात भा.द.वी. 376 (2) (फ) (एन) 323, 506 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 6 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. यातील संशयित आरोपीला रविवारी रात्रीच अटक करण्यात आली आहे. आज त्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याची रवानगी चार दिवसांसाठी (8 ऑक्टोबर) पोलीस कोठडीत केली आहे. संबंधित तरुणीवर प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकाराने अवघ्या तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित संशयिताला आज दुपारी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे केले जाणार असून पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.
एकंदरीत हा प्रकार बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारा आहे. मात्र अद्यापही हे पूर्ण सत्य नसल्याने आम्ही आमची जबाबदारी ओळखून या प्रकरणातील कोणाही व्यक्तिची अथवा त्यांच्या रहिवासाची ओळख स्पष्ट होवू दिलेली नाही. सदर तरुणीने चुलत भावानेच आपल्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हंटले असले तरीही, संशयिताने पोलिसांना मात्र वेगळीच माहिती दिली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत त्याच्या चौकशीतून या प्रकरणाचे वेगळेच पैलू समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकार खरोखरी घडला की वेगळेच काही प्रकरण आहे, सख्खा चुलत भाऊ असे करेल का? केले असेल तर त्यामागे काही हेतू आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या उकलीतून या प्रकरणातील वास्तव समोर येणार आहे.