… तर व्यावसायिक फोटोग्राफरांवर उपासमारीची वेळ येईल! मोबाईलद्वारे फोटो काढण्याची कला रुढ झाल्याने व्यक्त होतेय भीती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूवीच्या काळी काढलेले ब्लॅक व्हाईट फोटो जपून ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत होते. परंतु सध्याच्या डिजिटलच्या जमान्यात ब्लॅक व्हाईट फोटो कालबाह्य झाले आहेत. आताच्या डिजिटलच्या जमान्यात लाखो रुपये खर्चून कलात्मक फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरांनी डिजिटल कॅमेरे घेतले. मात्र, दिवसेंदिवस बदलत चाललेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात मोबाईलद्वारे फोटो काढण्याची वेगळी कला समाजात रुढ झाल्याने व्यावसायिक फोटोग्राफी करणार्या फोटोग्राफरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे, अशी भीती संगमनेरातील छायाचित्रकारांनी व्यक्त केली आहे.

19 ऑगस्ट 1839 ला सर्वप्रथम छायाचित्रणाची संकल्पना सुरु झाली. त्यामुळे 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. त्यानिमित्ताने थोडक्यात फोटोग्राफीच्या इतिहासाचा घेतलेला आढावा असा कि, छायाचित्रणाचा 1839 ला शोध लागल्यानंतर लुईस डग्यूरी या शास्त्रज्ञाने छायाचित्रणाविषयी अनेक प्रयोग करुन उपयुक्त असे छायाचित्रणाचे तंत्रज्ञान विकसित केले आणि त्यानंतर सन 1884 ला जॉर्ज इस्टमन याने बॉक्स कॅमेरा आणि कलर फिल्म शोध लावला. तेव्हापासून खर्या अर्थाने फोटोग्राफी ही समाजात रुढ झाली. सन 1924 ला व्यापारी तत्वावर कॅमेरा सुरु झाला. सन 1987 ला अॅटोमेटीक इलेक्ट्रॉनिक्स अॅटो फोकस एसएलआर कॅमेरा बाजारात आला आणि सन 1995 ला डिजिटल कॉम्पॅक्ट कॅमेरा बाजारात आला आणि त्यानंतर थ्रीडी फोटोग्राफीचे कॅमेरे उपलब्ध होवू लागले.

पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट जमाना होता त्याकाळचे फोटो जपून ठेवण्यात वेगळेपणाच होता. एका आनंदाच्या क्षणी फोटो काढले जात होते, तेही कित्येक वर्ष जपून ठेवत होते. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानात बदल होत गेला तस तसा फोटो ग्राफीतही बदल होत गेला. पूर्वीच्या काळी बोटावर मोजण्याइतकेच फोटोग्राफर होते. त्यामुळे लवकरात लवकर फोटोग्राफर मिळणे अवघड होत होते. परंतु आता डिजिटलचा जमाना आल्यामुळे फोटोग्राफरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात लाखो रुपये खर्चून फोटोग्राफर कलात्मक फोटोग्राफीसाठी डिजिटल कॅमेरे खरेदी करतात. परंतु सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईलद्वारे फोटो काढण्याची पद्धत सुरु झाल्याने कलात्मक फोटोग्राफीवर उतरती कळा येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कलात्मक फोटोग्राफी करणार्या फोटो संघटनेतील सर्व सदस्यांनी एकत्रित येवून, येणार्या या व्यवसायाचा सामना करण्यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे प्रबोधन कसे करता येईल यासाठी एकत्र येवून प्रयत्न करावेत असे आवाहन जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने व्याससायिक छायाचित्रकार काशिनाथ गोसावी यांनी केले आहे
