पिकअप फसला अन् अकरा जनावरांची कत्तलीपासून झाली सुटका! बेलापूर येथील घटना; श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कत्तल करण्याच्या इराद्याने पिकअपमध्ये अकरा गोवंशीय जनावरे खचाखच भरुन जात असताना बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पिकअप फसला अन् त्यातील जनावरे पाहून नागरिकांनी पोलीसांना पाचारण केले. त्यानंतर अकरा जनावरांची कत्तलीपासून सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी पिकअपसह सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन दिवसांपूर्वी बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पाईपलाईन फुटल्यामुळे ती दुरुस्त करुन खड्डा बुजविण्यात आला. बुधवारी (ता.17) सकाळी अकरा वाजता अकरा गोवंश जातीची जनावरे भरुन पिकअप (क्र.एमएच.11, टी.5499) वळण घेत असताना खड्ड्यात फसली. त्यावेळी वाहन बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले. परंतु पिकअपमधील दृश्य पाहून नागरिकांचा संताप अनावर झाला. पिकअपमध्ये अकरा गोवंश जनावरे दाटीवाटीने घुसविलेले होते. त्यात एक गाय मृतावस्थेत होती.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, शिवप्रतिष्ठाणचे किसन ताक्टे, रोहित शिंदे, राहुल माळवदे, प्रफुल्ल डावरे, स्वप्नील खर्डे, सागर लाहोर, स्वप्नील खैरे, भूषण चंगेडिया यांनी काही अघटित होण्यापूर्वीच पोलिसांना ही माहिती दिली. बेलापूर पोलीस चौकीचे हवालदार अतुल लोटके यांनी श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना याबाबत कळविले. त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेवरुन बेलापूर पोलीस झेंडा चौकात आले व जनावरांनी भरलेला पिकअप ताब्यात घेतला.
प्रकाश पोळ (रा. मांजरी) हा अमोल विटनोर यांच्या सांगण्यावरुन ही जनावरे कत्तल करण्याच्या इराद्याने घेवून जात असल्याची माहिती समजली. पोलिसांनी कारवाई करुन त्याच्या ताब्यातील तीन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेली अकरा गायी व वासरे संगमनेर येथील जीवदया गोशाळेत पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी बेलापूर पोलीस चौकीचे पोलीस शिपाई निखील तमनर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारित कायदा कलम 2015 चे कलम 5, 5(ब)(क)9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार अतुल लोटके हे करत आहे.