बुडीत वाहनाच्या शोधकार्यात खून प्रकरणातील मृतदेह लागला हाती? वाढत्या प्रवाहाने शोधकार्यात अडथळे; मुख्यमंत्र्यांनी पाठविली ‘टीडीआरएफ’ची टीम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पिंपरणे-जोर्वे रस्त्यावरील प्रवरानदीच्या पुलावरुन पात्रात कोसळून वाहून गेलेल्या दोघांसह त्यांच्या वाहनाचा शोध घेण्यात अद्यापही यश मिळालेले नाही. मात्र पिंपरण्याजवळ पाण्याखाली असलेल्या वाहनाचे ‘लोकेशन’ मिळाले असून बुडालेले दोघेही त्यातच अडकलेले असण्याची शक्यता आहे. मात्र काल सायंकाळपासून निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला गेल्याने शोधकार्यात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे बुडीत वाहनाचे लोकेशन मिळूनही ते बाहेर काढणे शक्य झालेले नाही. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी ठाण्यातील टीडीआरएफच्या टीमला संगमनेरकडे रवाना केले असून आज दुपारी चार वाजेपर्यंत त्यांचे पथक संगमनेरात पोहोचण्याची शक्यता आहे. या वाहनाचा शोध सुरु असतांनाच आज सकाळी दाढ जवळील नदीपात्रात शोधपथकाला एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. सदरचा मृतदेह गेल्या बुधवारी (ता.10) वेल्हाळे शिवारात खून करुन नदीपात्रात फेकलेल्या बाळू शिरोळे याचा असण्याची शक्यता असली तरीही अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
गेल्या सोमवारी (ता.15) प्रकाश किसन सदावर्ते हे आपल्या पिकअप वाहनात काचा घेवून सुभाष आनंदराव खंदारे व अमोल अरुण खंदारे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे आले होते. रात्री आठच्या सुमारास त्यांनी संदीप नागरे यांच्याकडे काचा खाली केल्यानंतर ते तिघेही आपल्या वाहनातून जोर्वे-पिंपरणे रस्त्याने संगमनेरकडे जाण्यासाठी निघाले. त्यांचे वाहन पिंपरणेनजीकच्या प्रवरानदीच्या पुलावर आल्यानंतर वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांचे वाहन पुलाच्या कठड्याला धडकून प्रवरानदीत पडले. सध्या निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले असल्याने क्षणात त्यांचे वाहन पाण्यात बुडाले. यावेळी वाहनात बसलेल्या अमोल खंदारे यांनी वाहनाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी उघड्या असलेल्या खिडकीतून कसेबसे बाहेर पडून पोहत किनारा गाठला व आपला जीव वाचवला. मात्र वाहनचालकासह त्याचा चुलता मात्र स्वतःचा बचाव करु शकले नाहीत.
मंगळवारी (ता.16) सकाळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार यांना सदरची घटना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले. मात्र प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्यांचे प्रयत्न थोटके पडले. त्यामुळे त्यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व आपत्ती व्यवस्थापनाचे तालुका प्रमुख तथा तहसीलदार अमोल निकम यांना याबाबतची माहिती देत शोधकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूने मंगळवारी दुपारपासून शोधकार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेत पिंपरणे ते ओझर पर्यंतच्या नदीपात्रात बुडीत वाहनाचा शोध सुरु केला.
या कामात क्रेनसह आसपासच्या परिसरातील पट्टीच्या पोहणार्यांचीही मदत घेतली गेली. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या शोधकार्यास यश आले नाही. आज (ता.17) सकाळपासून पुन्हा शोध करण्यात आला असता दाढ शिवारातील नदीपात्रात शोध पथकाला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो गेल्या बुधवारी (ता.10) आठ जणांनी अपहरण करुन नंतर वेल्हाळे शिवारात त्याचा निर्घृण खून करुन कासारवाडी शिवारातील पुलावरुन प्रवरा पात्रात फेकण्यात आलेल्या येठेवाडी येथील बाळू शिरोळे याचा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यासाठी त्याच्या कुटुंबियांनाही पाचारण करण्यात आले असून वृत्त लिहेपर्यंत ते पोहोचलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी सदरचा मृतदेह लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून तेथे त्याचा डीएनए तपासला जाणार आहे.
सदरचा मृतदेह सापडल्यानंतर काहीकाळ बंद करण्यात आलेली शोध मोहीम पुन्हा सुरु करण्यात आली. या दरम्यान पिंपरणे नजीकच्या प्रवरापात्रात मधोमध पात्रात कोसळलेले वाहन असल्याची माहिती शोधकार्य करणार्यांनी प्रशासनाला दिली. मात्र बरेच प्रयत्न करुनही पात्राच्या मधल्या भागातून सदरचे वाहन बाहेर काढण्यात अपयश आले. वाहुन गेलेला चालक आणि त्याचा जोडीदारही वाहनातच फसलेले असण्याचीही शक्यता यावेळी वर्तविण्यात आली. सदरचे वाहन बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने मोठ्या क्रेनचाही वापर केला, मात्र त्याचाही फारसा फायदा झाला नाही.
त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कारवाई करीत ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन चमूतील गोताखोरांना संगमनेरात पाठविण्याचे आदेश बजावले असून आज दुपारी चार वाजेपर्यंत हे पथक संगमनेरात पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री उशिराने निळवंडे धरणातून 17 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते, ते पाणी अजूनही संगमनेरात दाखल झालेले नसल्याने पुढील काही तासांत नदीपात्रातील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या शोधकार्यात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. मंगळवारी सदरचा प्रकार समोर आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार व नायब तहसीलदार उमाकांत कडनोर आदी अधिकारी मंडळी पिंपरण्याजवळ ठाण मांडून बसले असून शोधकार्याचे संचलन करीत आहेत. वाहनाचा शोध लागल्याने लवकरच बुडालेल्या दोघांचा ठावठिकाणाही समोर येईल असा विश्वास यावेळी शोधकार्यातील अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.