लोखंडी फळ्या चोरणारी टोळी पकडली पुणतांबा येथील घटना; ग्रामस्थांची सतर्कता
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पुणतांबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या वसंत बंधार्यात पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणार्या लोखंडी फळ्या चोरणारी टोळीच ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.
दोन दिवसापूंवी बंधार्याच्या 25 लाख रुपये किंमतीच्या 255 लोखंडी फळ्या चोरीस गेल्या होत्या. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट होती. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी सात वाजेच्या सुमारास येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी गमे आपल्या डोणगाव परिसरातील शेतात कामानिमित चालले होते. रस्त्याने त्यांना बंद पडलेला छोटा हत्ती दिसला. त्यांनी चौकशी केली असता त्यात लोखंडी फळ्या दिसून आल्या. त्यांनी तातडीने परिसरातील शेतकर्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना गोळा केले. शेतकरी येईपर्यंत त्यांनी चोरट्यांशी दोन हात केले. चोरटे व त्यांच्यात झटापट झाली.
मात्र शेतकरी येईपर्यंत त्यांनी चोरट्यांना जखडून ठेवले. घटना समजताच मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोखंडी फळ्या भरलेला टेम्पो आणि आठ जणांना ताब्यात घेतले. संभाजी गमे यांनी मोठ्या धाडसाने चोरट्यांशी दोन हात केल्याबद्दल त्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, शिवसेना नेते सुहास वहाडणे यांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चोरीची पाळेमुळे शोधून काढावीत या चोरीमध्ये कोण सहभागी आहे. तसेच लोखंडी फळ्या विकत घेणार्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी पुणतांब्यातील शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने राहात्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांची भेट घेतली आहे. दरम्यान लोखंडी फळ्या चोरणार्या टोळीच्या अनुषंगाने परिसरातील अनेक चोर्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे.