स्वातंत्र्यदिनी संगमनेरात पुन्हा एकदा वाटमारीची घटना! चाकूचा धाक दाखवित दोघांना लुटले; पंधरवड्यातील दुसर्या घटनेने शहरात खळबळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची धूम असताना संगमनेरातून मात्र पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच नगर रस्त्यावरील समनापूर चौफुलीवर एका माजी नगरसेवकाची कार रोखून वाटमारीची घटना घडलेली असतांनाच आता त्याच रस्त्यावरील दुसर्या बाजूच्या चौफुलीवर पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत दुचाकीवरुन घराकडे निघालेल्या दोघांना तिघा सशस्त्र चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवित अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम व दोघांचे मोबाईल घेवून पोबारा केला. या घटनेने संगमनेरात आता वाटमारीचे प्रकारही नियमितपणे घडू लागल्याचे स्पष्ट झाले असून देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना संगमनेरकरांना मात्र चोरट्यांच्या दहशतीपासून अद्यापही स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे दिसू लागले आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.15) मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जोर्वे रस्त्यावरील निंबाळे चौफुलीवर घडली. धनंजय बाबासाहेब वर्पे हा एकोणतीस वर्षीय तरुण आपला चुलत चुलता किरण वर्पे यांच्यासह सोमवारी सायंकाळी संगमनेरात आले होते. शहरातील कामकाज आटोपल्यानंतर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते दोघेही धनंजय वर्पे यांच्या दुचाकीवरुन आपल्या घराकडे रहिमपूर येथे जाण्यासाठी निघाले. त्यांची दुचाकी जोर्वे नाक्यावरुन निंबाळ्याकडे जात असतांना समनापूरकडून येणार्या बायपास रस्त्यावरील चौफुलीवर अचानक तिघेजण त्यांना आडवे झाले.
यावेळी सशस्त्र असलेल्या त्या तिघाही चोरट्यांनी दुचाकीवरील दोघांना चाकूचा धाक दाखवून हाताने चापडी मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुचाकीवरील काका-पुतणे घाबरले व त्यांनी तुम्हाला काय पाहीजे ते घ्या, पण मारु नका अशी विनवणी त्या चोरट्यांना केली. त्यानंतर त्यातील एकाने धनंजय वर्पे याच्या खिशातील तीन हजार रुपयांची रोकड व त्याचा आठ हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा रेनो टू एफ मोबाईल व त्याच्या सोबत असलेल्या किरण वर्पे यांचा पाच हजार रुपये किंमतीचा एम.आय.रेडमी मोबाईल असा एकूण 16 हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला.
या प्रकाराने घाबरलेले ते दोघेही दुचाकीस्वार पुढे घराकडे न जाता तेथून माघारी फिरले व त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही सरकारी वाहनात बसवून घटना घडली तो संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. अखेर आज पहाटे पावणे चारच्या सुमारास धनंजय वर्पे यांची फिर्याद घेण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांच्याकडे सोपविला आहे. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थही भेट देवून चोरट्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
समृद्ध व सुसंस्कृत शहरांमध्ये गणना होणार्या संगमनेरात रस्त्यात वाहने आडवून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार इतिहासात कधीही घडलेले नाहीत. मात्र या परंपरेला छेद देणारी घटना गेल्या पंधरवड्यापूर्वी समोर आली होती. पालिकेचे माजी नगरसेवक किशोर टोकसे यांचे चारचाकी वाहन घेवून कोंची येथील घराकडे निघालेल्या त्यांच्या वाहन चालकाला नगर रस्त्यावरील समनापूर चौफुलीवर पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी आडवून त्यांच्याकडील किरकोळ रक्कम व त्याचा मोबाईल लांबविला होता. या घटनेने संगमनेरात एकच खळबळ उडाली होती. संगमनेरात अशाप्रकारच्या घटना कधीही घडलेल्या नसल्याने पोलिसांनी गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली होती.
मात्र त्यावर कोणतीही कारवाई होण्यापूर्वीच त्याच रस्त्यावरील दुसर्या बाजूला आता पुन्हा एकदा दुचाकीवरील तिघांनीच मोटारसायकलस्वाराला भर रस्त्यात शस्त्रांचा धाक दाखवून लुटल्याने संगमनेरात वाटमारी करणारी व सध्या सक्रीय मोडमध्ये असलेली टोळी आपले पाय घट्ट करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. संगमनेर पोलिसांची निष्क्रीयता शहरात कधीही न घडलेल्या अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांना निमंत्रण देणारी ठरत असल्याचे धडधडीत वास्तवही यानिमित्ताने अधिक स्पष्टपणे समोर आले आहे.