खंदरमाळवाडीमध्ये अकरा लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅसचे वाटप
खंदरमाळवाडीमध्ये अकरा लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅसचे वाटप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली डोके यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत आत्तापर्यंत परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना गॅसचे वाटप केले असून पुन्हा मंगळवारी (ता.29) सकाळी अकरा लाभार्थ्यांना संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गॅसचे वाटप केले आहे. त्यामुळे गॅस पाहून अनेक महिलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते तर पहिल्यांदाच आम्हांला गॅस मिळाला असल्याचे काही महिलांनी सांगितले.
कृषी विभागाचे सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक दिलीप वाकचौरे यांचा सपत्नीक सत्कार व गॅस वाटप असा छोटाशा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अॅड.दिलीप साळगट, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, दत्ताभाऊ गाडेकर, गणेश लेंडे, वनविभागाच्या सवीता थोरात, रोहिदास भोईटे, रवींद्र लेंडे, नांदूर खंदरमाळ सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब लेंडे, राजू भुजबळ, धोंडीभाऊ शिरोळे, भाऊसाहेब गाडेकर, निवृत्ती गाडेकर, ग्रामसेवक भारत देशमुख, शैलेश गाडेकर आदी उपस्थित होते. सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खूप अडी-अडचणींचा सामना करावा लागला. परंतु हळूहळू सर्वांचे सहकार्य मिळत गेल्याने खर्या अर्थाने विकासकामांना सुरूवात झाली. त्यामुळे आज पाच वर्षांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासह वाड्या-वस्त्यांवर विकास कामांचा डोंगर उभा करता आला असल्याची भावना सरपंच वैशाली डोके यांनी व्यक्त केली. तर पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत सव्वा दोनशे तर संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून एकोणतीस असे एकूण 244 गॅसचे वाटप केले असल्याचेही सांगितले. यावेळी किशोर डोके, गणेश लेंडे, दिलीप साळगट, रवींद्र लेंडे यांसह महिलांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष लेंडे, शरद सुपेकर, सीमा लेंडे, लक्ष्मण गोंधे आदिंनी परिश्रम घेतले.