अखेर ‘येठेवाडी’ प्रकरणात अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! पोलीस निरीक्षक फिर्यादी; ताब्यात असलेल्या आठ जणांची कारागृहात रवानगी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण संगमनेर तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या येठेवाडी हत्याकांड प्रकरणात अखेर पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख स्वतः फिर्यादी झाले असून त्यांनी ताब्यात असलेल्या आठजणांनी बाळू शिरोळे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कट रचून त्याचे अपहरण केले व त्याला बेदम मारहाण करीत डोक्यात दगड घालून जखमी अवस्थेत प्रवरा नदी पात्रात वाहत्या पाण्यात फेकून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या केवळ ताब्यात असलेल्या आठ जणांची रवानगी आता कारागृहात करण्यात आली आहे. गेल्या बुधवारी प्रवरा नदीपात्रात फेकून दिलेला जखमी इसम 84 तासांनंतरही अद्यापही सापडलेला नाही.

खंदरमाळवाडीच्या अंतर्गत येणार्‍या येठेवाडी येथील हा प्रकार असून अठरा वर्षांपूर्वी या परिसरातील एक विवाहित महिला आपला पती व मुलाबाळांना सोडून याच गावात राहणार्‍या बाळू सीताराम शिरोळे या इसमासोबत पळून गेली होती. त्यावेळी अवघ्या 9 वर्षांच्या असलेल्या तिच्या मुलाला हा प्रकार खटकला होता. मात्र वय कमी असल्याने तो त्यावेळी काहीही करु शकला नव्हता, परंतु या संपूर्ण प्रकाराने त्याला व त्याच्या कुटुंबाला सोसाव्या लागलेल्या बदनामीची सल त्याच्या मनात कायम असल्याने प्रतिशोध घेण्याची ज्वाळा तेव्हापासून त्याच्या मनात प्रज्ज्वलित झालेली होती.

गेल्या बुधवारी (ता.10) बाळू शिरोळे हा संगमनेरच्या न्यायालयात येणार असल्याची पूर्वमाहिती त्या महिलेच्या मुलाला समजली. त्यानुसार त्याने आपल्या नात्यातील तिघांसह अन्य चार साथीदारांना सोबत घेत कट रचून संगमनेरात आलेल्या बाळू शिरोळेचे दुपारी तीनच्या सुमारास घुलेवाडी फाट्यावरुन त्याचे अपहरण केले. त्यानंतर बळजोरीने त्याला वेल्हाळे शिवारातील एका शेतातील खोलीत डांबून ठेवण्यात आले. तेथे नेल्यानंतर आरोपी सागर शिवाजी वाडगे, शिवाजी गेनू वाडगे (दोघे रा.येठेवाडी), संपत मारुती डोळझाके (रा.साकुर), मनोज एकनाथ चव्हाण (रा.पेमगिरी), शुभम सुनील खताळ (रा.धांदरफळ) व दाऊ उर्फ दिनेश बाळू जेधे (रा.घुलेवाडी) यांनी त्याला हाताने व कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली.

हा सर्व प्रकार सुरू असताना या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सागर व त्याचे वडील शिवाजी वाडगे या दोघांनी गेल्या 18 वर्षांपासून त्यांच्या मनात धगधगणारी प्रतिशोधाची ज्ज्वाळा शांत करण्यासाठी दगडाने त्याच्या डोक्यात घाव घालून त्याला जबर जखमी केले. आरोपी अण्णा वाडगे याने तो अर्धमेला झाला की नाही याची खात्री केली. त्यानंतर त्याने मनोज चव्हाण व शुभम खताळ यांना ‘याला प्रवरा नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून द्या’ असे सांगितले. त्यानुसार त्या दोघांनीही जबर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बाळू सीताराम शिरोळे याला मोटरसायकल वरून आणून बुधवारी (ता.10) रात्री साडेनऊच्या सुमारास कासारवाडी शिवारातील मोठ्या पुलावरून नदीत फेकून दिले.

गुरुवारी (ता.11) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, सहाय्यक फौजदार राजू गायकवाड, पोलीस नाईक अमित महाजन, पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, श्रीरामपूर अप्पर अधीक्षक कार्यालयातील फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव व गणेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी अवस्थेत नदीपात्रात फेकून देण्यात आलेल्या बाळू शिरोळे याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सध्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने व त्यातच भंडारदरा व निळवंडे ही दोन्हीही धरणे तांत्रिकदृष्ट्या भरलेली असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्याचा परिणाम मागील 72 तासांपासून जखमी शिरोळे याचा शोध सुरू असूनही अद्यापपर्यंत त्याचा कोठेही ठावठिकाणा लागलेला नाही.


दरम्यानच्या कालावधीत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी उकरुन काढली असून येठेवाडी येथील एक महिला अठरा वर्षांपूर्वी बाळू सीताराम शिरोळे यांच्यासोबत पळून गेली होती. आजतागायत ती त्याच्याच सोबत राहत होती. याच गोष्टीचा राग मनात धरून तिचा पती व मुलगा या दोघांनी नियोजनबद्ध कट रचला. त्यासाठी त्यांनी आपले काही नातेवाईक व मित्रमंडळींना सोबत घेऊन शिरोळेचे घुलेवाडीतून अपहरण केले. तेथून त्याला बळजबरीने वेल्हाळे शिवारात नेऊन तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. नंतर सागर व शिवाजी वाडगे यांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जबर जखमी केले व त्याच अवस्थेत त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बेशुद्ध अवस्थेत पुराच्या पाण्यात फेकून दिले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडून चार दिवसांचा कालावधी उलटूनही शिरोळे याच्या कुटुंबीयांकडून फिर्याद देण्यास कोणीही पुढे आलेले नाही.


एकीकडे इतका मोठा प्रकार घडूनही जखमी अवस्थेत बेपत्ता झालेल्या इसमाच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार दाखल होत नसल्याने व मारहाण करून नदीपात्रात फेकून दिलेला बाळू शिरोळे सापडत नसल्याने पोलीस तांत्रिक अडचणीत सापडले होते. ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवीत या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारासह आठ जणांना ताब्यातही घेतले. मात्र तक्रारच दाखल नसल्याने त्यांना अटक करण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर शनिवारी रात्री उशिराने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी स्वतः फिर्यादी होत नियोजनबद्ध कट रचून (120 ब) बाळू सीताराम शिरोळे येठेवाडी याचे बरे वाईट करण्याच्या उद्देशाने बळजबरीने अपहरण (364) करणे, त्याला बेदम मारहाण (323) करणे व डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (307) करण्यासह पुरावा नष्ट करण्याच्या कलम 201 सह 504 प्रमाणे गुन्हा दाखल करीत गेल्या 72 तासांपासून ताब्यात असलेल्या सागर शिवाजी वाडगे, शिवाजी गेनू वाडगे, दत्ता वाडगे, अण्णा वाडगे (सर्व रा.येठेवाडी), संपत मारुती डोळझाके (रा.साकुर), मनोज एकनाथ चव्हाण (रा.पेमगिरी), शुभम सुनील खताळ (रा.धांदरफळ) व दाऊ उर्फ दिनेश बाळू जेधे (रा.घुलेवाडी) या सर्वांची रवानगी कारागृहात केली आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 115275

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *