नायकने वाचकांना उत्तम साहित्य देण्याची परंपरा जपली ः योगी केशवबाबा चौधरी दिवाळी अंकाचे वीरगाव येथे शानदार प्रकाशन
नायक वृत्तसेवा, अकोले
नायकने दीपावली अंकाच्या माध्यमातून वाचकांना उत्तम साहित्य देण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. साहित्य आणि दीपावली याचे अतूट नाते असून उत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध करुन दिल्यास वाचकांना ते भावते, असे प्रतिपादन योगी केशवाबाबा चौधरी यांनी केले.
उत्तर नगर जिल्ह्यातून प्रकाशित होणार्या दैनिक नायकने यंदाही दीपावली पर्वानिमित्त वाचकांना खास पर्वणी देण्यासाठी दर्जेदार साहित्याने परिपूर्ण दिवाळी अंक आज प्रकाशित केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, उपसरपंच संजय थोरात, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, भाऊसाहेब वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कुमकर, अॅड. आनंद थोरात, गणेश अस्वले, मयूर देशमुख आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना योगी केशवबाबा चौधरी म्हणाले, उत्तम साहित्य हे वाचकांच्या मनावर अधिराज्य करत असते. वाचकही उत्तम साहित्याच्या शोधात असतात. त्यामुळे वाचनसंस्कृती संपली आहे असे नाही तर वाचकांना भिडणारे साहित्य भोवतालमध्ये उपलब्ध होत नसतील तर वाचक दुरावण्याची शक्यता अधिक असते. मात्र नायकने राज्यातील उत्तम साहित्य लिहिणारे साहित्यिक निवडून वाचकांची भूक भागविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे म्हणाले की, ग्रामीण भागातील तरुणांनाही वाचनाची अभिरुची विकसित करण्याची गरज आहे. वाचनामुळे समृद्धता उंचावते. दीपावली अंक हाही वाचकांना आनंद, मनोरंजन देण्याबरोबर बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करण्यास हातभार लावत असतो. त्यामुळे नायकने महाराष्ट्राची दिवाळी अंकाची उच्चतम परंपरा जोपासण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
यावेळी बाळासाहेब मुळे यांचेही मनोगत झाले. संपादक गोरक्षनाथ मदने यांनी प्रास्ताविक केले. अतिथी संपादक संदीप वाकचौरे यांनी अंक निर्मितीमागील पार्श्वभूमी व दिवाळी अंकाची परंपरा याविषयी मनोगत व्यक्त केले. उपसंपादक महेश पगारे यांनी आभार मानले.