शाहूनगरमधील एकल महिला जगताहेत उपेक्षितांचे जीवन सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींनी साजरे केले अनोखे रक्षाबंधन

नायक वृत्तसेवा, अकोले
शहरातील शाहूनगरमधील 23 तरुणांचा दारुने 10 वर्षात मृत्यू झालेला आहे. तरी देखील येथील अवैध दारु बंद होत नाहीये. या बंदसाठी संघटनेत काम करणार्या एकल महिलांच्या घरी रक्षाबंधन साजरे करण्याचे ठरविले होते. त्यानुसार कोरोना एकल समितीचे सक्रीय कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी रात्री गेले त्यावेळी तेथे परिस्थिती हलाखीची असल्याने वीजही नाही आणि शासकीय सुविधांची वाणवा असल्याचे त्यांना दिसले. यावरुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या एकल महिला अजूनही उपेक्षितांचे जीवन जगत असल्याने त्यांचे रक्षण तरी कसे करावे? असा सवाल करुन येत्या स्वातंत्र्य दिनी दारुबंदीसाठी उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही सांगितले.

अकोले शहरातील शाहूनगरमधील दोन एकल भगिनींकडे रक्षाबंधनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी गेले होते. त्या दोन्हीही घरात वीज नव्हती. एका भगिनीची मुलगी दहावीत शिकते तरीही तेथेही वीज नव्हती. तिचा नवरा रंगकाम करत होता मात्र दारुने त्याचा मृत्यू झालेला आहे. येत्या 4 दिवसांनी वर्षश्राद्ध आहे. पतीच्या मृत्यूनंतर ही भगिनी स्वयंपाकाच्या कामाला मंगल कार्यालयात जाते. त्यामुळे घराचा उदरनिर्वाह करावा की वीज घ्यावी असा प्रश्न तिला सतावत आहे. परिस्थितीमुळे एका मुलाला वसतिगृहात ठेवले असल्याचे समजले.

त्यानंतर दुसर्या घरी गेले. तेथील भगिनी नाजूबाईच्या घरातही हीच अवस्था होती. दारातच तिचा मुलगा दारु पिऊन पडलेला होता. तिच्या नवर्याचाही दारुने मृत्यू झालेला आहे. मोठा मुलगा अवघ्या 18 वर्षांचा असताना दारुच्या अतिसेवनाने गेला आणि आता हा दुसरा मुलगाही सतत दारु पिऊन मृत्यूच्या दाढेत आहे. विषेश म्हणजे आजही तो दारु पिलेलाच होता. त्याची बायको त्याला वैतागून निघून गेली आहे. नाजूबाई तीन घरची भांडी घासते आणि त्या 1500 रुपयांत घर चालवते. नाजूबाईच्या घरी ना वीज ना सविधा, साधे रेशनकार्डही नाही. त्यामुळे गहू, तांदूळ, बाजरी तिला बाजारभावाने खरेदी करावे लागते.

यावेळी याच वस्तीतील कार्यकर्त्या संगीता साळवे सोबत होत्या. त्यांचाही पती दारुमुळे मृत्यू पावला असून त्या तीन मुलांचा सांभाळ करते आहे. त्यामुळे दारुने इतका हैदोस असताना राखी बांधणार्या या भगिनींचे आम्ही कसे रक्षण करणार आहोत? कसे संसार सावरणार आहोत? याने अस्वस्थता आली असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त करत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही समाजातील अनेक घट उपेक्षितांचे जीवन जगत असल्याची खंतही व्यक्त केली. आणि येत्या स्वातंत्र्य दिनी दारुबंदीसाठी उपोषणावर ठाम असल्याचेही सांगितले.
