पोटच्या मुलाने आईच्या प्रियकराचा काटा काढला! अपहरण करुन खून; बारा जणांवर संशय, सात ताब्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नऊ वर्षांचा असताना आपल्या जन्मदात्या आईला एकाने पळवून नेले. त्यानंतर आजतागायत ती त्याच्या सोबतच राहत असल्याच्या तब्बल 18 वर्षांच्या रागातून पठार भागातील एकाने आपल्या साथीदारांसह आईच्या प्रियकराचे अपहरण करून त्याचा दगडाने ठेचून खून केला व मृतदेह प्रवरा नदीपात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह 7 जणांना ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडात एकूण 12 जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून उर्वरित आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. सध्या प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने या घटनेत मयत झालेल्या प्रियकराचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. या वृत्ताने पठार भागासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुमारे 18 वर्षांपूर्वी पठार भागातील एका विवाहित महिलेला ऐठेवाडी येथील बाळू शिरोळे या इसमाने पळवून नेले होते. तेव्हापासून सदरील महिला शिरोळे यांच्या सोबतच राहत होती. हा प्रकार घडला तेव्हा या महिलेचा नऊ वर्षांचा मुलगा सागर हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहून मनातल्या मनात जळत होता. मात्र त्यावेळी त्याचे वय कमी असल्याने तो काहीही करू शकला नाही. मात्र त्याच्या मनातली प्रतिशोध घेण्याची आग आजपर्यंत धगधगत होती. त्याचाच परिणाम तब्बल 18 वर्षांनंतर संधी मिळताच त्या महिलेच्या आज 27 वर्षीय असलेल्या मुलाने आपल्या अन्य अकरा साथीदारांसह आपल्या मनातील प्रतिशोधाची ज्वाळा शांत केली. बुधवारी (ता.10) त्याच्या आईचा प्रियकर बाळू शिरोळे हा न्यायालयीन कामकाजासाठी संगमनेरच्या न्यायालयात येणार असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानुसार त्याने आपल्या साथीदारांसह कट रचला व त्याचे अपहरण करून त्याला वेल्हाळे शिवारातील अज्ञात ठिकाणी नेले. तेथे त्याला सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली व नंतर दगडाने ठेचून त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवरा नदीच्या पुलावरून मयत शिरोळे याचा मृतदेह पुराच्या पाण्यात फेकून देण्यात आला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तपासाची सूत्रे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी हाती घेतली. यावेळी ऐठेवाडीतून गायब झालेल्या शिरोळे याच्या बाबतची माहिती संकलित करीत असताना अपहृत व्यक्तीचे त्या परिसरातीलच एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असल्याची व नवरा आणि मुले असतानाही ती गेल्या 18 वर्षांपूर्वी त्याच्या सोबतच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यादृष्टीने तपास केला असता एक एक कडी उलगडत गेली आणि भीषण खुनाचा हा संपूर्ण प्रकार समोर आला. यानंतर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने मुख्य सूत्रधार सागर शिवाजी वाडगे व त्याचे वडील शिवाजी गेनू वाडगे या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडून हा संपूर्ण प्रकार समोर आला. या घटनाक्रमात एकूण बारा आरोपींचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय असून त्यातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बाप-लेकासह दत्ता भाऊराव वाडगे, संपत मारुती डोळझाके व दिनेश जेधे यांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींबाबतही पोलिसांना नेमकी माहिती प्राप्त झाली असून त्यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
या एकूण प्रकरणामध्ये पठारभागातील पाच ते सहा व संगमनेर परिसरातील तितक्याच आरोपींचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. मयत बाळू शिरोळे याचे अपहरण केल्यानंतर त्याला वेल्हाळे शिवारातील शेतात असलेल्या एका घरात दाबून ठेवण्यात आले होते. या दरम्यान सर्व आरोपींनी मिळून तेथे त्याला बेदम मारहाण केली. आईला पळवून नेल्याचा आपला 18 वर्षाचा राग काढताना सागर वाडगे याने बेदम मारहाणीत जखमी होऊन अर्धमेल्या झालेल्या शिरोळे यांच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर या सर्वांनी मिळून त्याचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवरा नदीच्या पुलावर नेऊन तेथून तो नदीपात्रात फेकून दिला. सध्या निळवंडे धरणातून बारा हजारपेक्षा अधिक क्यूसेकचा विसर्ग सुरू असल्याने प्रवरानदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मयताचा मृतदेह शोधण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून गुरुवारपासून शोध सुरू असूनही अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
तालुक्याच्या पठार भागात घडलेली ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ अशी असून आपल्या आईबरोबर झालेल्या प्रकारातून उद्दिग्न झालेल्या तरुणाने तब्बल 18 वर्षे आपल्या मनातील रागाची ज्वाळा धगधगती ठेवून अखेर आपला प्रतिशोध पूर्ण केला. मात्र या संपूर्ण प्रकारात अन्य दहा जणांचाही समावेश झाल्याने आता या सर्वांना दीर्घकाळ कारागृहातच घालावा लागणार आहे. या घटनेने पठार भागासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.