राज्यातील राजकीय धूळवड अत्यंत दुर्दैवी ः थोरात भाजपच्या स्वबळावरील सरकार स्थापनेवरुन जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात अडकले असून जनतेचा आघाडी सरकारमधील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. चार राज्यांत यश मिळाले. आता मिशन महाराष्ट्र आहे. 2024 मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच वक्तव्यावरून मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. सध्या ज्या पद्धतीची राजकीय धूळवड राज्यात पाहायला मिळत आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. सध्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी योग्य नसून तो अभिप्रेत नाही. व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण व्हायला नको. राजकारण विकासाचं असायला हवं, द्वेषाचं राजकारण सगळ्यांसाठी मारक आहे, असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2024 मध्ये सत्तेत आम्ही येणार, अशी घोषणा पुन्हा एकदा केली आहे. मी यापूर्वीही त्यांना अनेकदा म्हटलं आहे, आज पुन्हा म्हणतोय की, त्यांनी एकदा आरशापुढं उभं राहावं, त्यांना आरशात पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा पिंड हा राज्यात सत्तेत येण्यासाठी नव्हे, तर विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी बनलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

गोव्यात यश मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेचा भाजपावर विश्वास बसला आहे. वर्तमान राज्य सरकार हे घोटाळाबाजांचे सरकार आहे. रोज नवनवीन घोटाळे आणि गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत असल्याने सरकार कोंडीत सापडले आहे. माझ्याकडे आघाडीतील आणखी काही नेत्यांच्या विरोधात पुरावे आहेत. योग्यवेळी ते बाहेर काढण्यात येतील. गोव्यातील यशानंतर आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पुढे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने भाजपाची सत्ता येईल, असं फडणवीस म्हणाले होते. यावर काँग्रेस विधीमंडळ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.

Visits: 119 Today: 3 Total: 1106231

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *