गोंडेगाव ते जळगाव रस्त्याची दयनीय अवस्था स्वातंत्र्य दिनी संतप्त ग्रामस्थ करणार तीव्र आंदोलन
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील गोंडेगाव ते जळगाव दोन्ही गावांना जोडणार्या रस्त्याची गोंडेगाव हद्दीत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे फुटलेला असून पावसाच्या पाण्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजणे अवघड झाले आहे. तसेच चिखलाचे साम्राज्यही तयार झाले आहे. या रस्त्यावरून नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल झाले असून, दुचाकी व सायकलस्वार चिखलामुळे दररोज घसरून पडताना दिसत आहे. चारचाकी वाहने तर जाणे शक्यच होत नसल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. अनेकवेळा प्रयत्न करुनही या रस्त्याची कामे करण्यात आली नाही म्हणून स्वातंत्र्यदिनी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या रस्त्यावर गोंडेगाव हद्दीत गावापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरात थोरात, जगताप, म्हैस, टिळेकर, चव्हाण, फोपसे, चौरे यांच्या वस्ती असून शंभर ते दीडशे घरे आहेत. याठिकाणी अंदाजे 400 – 500 लोकसंख्या असणारी लोकवस्ती आहे. सर्व नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दूध उत्पादक शेतकरी तसेच लहान विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी चिखलातून व साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून रस्ता शोधत कसरत करावी लागते. काही लहान-मोठे अपघात घडत असतात. पर्यायी रस्ता म्हणून गावात येण्यासाठी काही नागरिकांना चांगदेवनगर किंवा चितळीवरून यावे लागत आहे.
जास्त प्रमाणात पाऊस झाला तर रेल्वेच्या बोगद्यात देखील जास्त पाणी साचले तर बंद पडतो. त्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता बंद होत असतो. जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा अचानक दुर्दैवाने एखादी घटना घडली तर कुठलीही गाडी, रुग्णवाहिका देखील येऊ शकणार नाही अशी या रस्त्याची अवस्था आहे. तसेच शेतातला माल व भाजीपाला बाजारात घेऊन जाता-येत नाही त्यामुळे गरीब शेतकर्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सराला बेट, गोवर्धन, नाऊर, नायगाव, जाफ्राबाद, जळगाव, वाकडी, गणेशनगर, राहाता शिर्डी येथे जाण्या-येण्यासाठी हा रस्ता जवळचा मार्ग असून परिसरातील अनेक कामगार गणेशनगर साखर कारखान्यात कामाला असून या सर्व कामगारांना विनाकारण लांबच्या मार्गाने जावे लागत असून वेळेचा आणि आर्थिक अपव्यय होत असतो.
गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम केले गेले नाही. 4-5 वर्षांतून तात्पुरता मुरूम टाकून मलमपट्टी केली जाते. लोकप्रतिनिधी लक्ष घालत नाहीत. आमदार व खासदार हे बाहेरचे असल्यामुळे ते लक्ष घालत नाहीत व काम होत नाही अशी या भागातील नागरिकांची भावना निर्माण होत आहे. आता या भागातील नागरिकांच्या डोक्यावरून पाणी चालले असल्याचे विजय सीताराम थोरात यांनी सांगितले. गावातील सर्वांनी एकजूट करून आंदोलन केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी आम्ही एकत्र येऊन स्वातंत्र्य दिनी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा विजय थोरात, शिवाजी थोरात, मच्छिंद्र चव्हाण, भारत चव्हाण, आबासाहेब थोरात, संतोष म्हैस, गोरख म्हैस, ताराचंद म्हैस, गोरख टिळेकर, राहुल म्हैस, विठ्ठल म्हैस, सचिन म्हैस, संतोष किसन म्हैस, दत्तात्रय म्हैस, दत्तात्रय निपटे, एकनाथ तळेकर, सचिन सोपान म्हैस, प्रमोद जगताप, प्रदीप जगताप, बाळासाहेब जगताप, संजय जगताप, दिलीप जगताप, गणेश अशोक जगताप, विजय फोपसे, पशुवैद्यक डॉ. रमेश चौधरी, डॉ. रवींद्र लहारे, डॉ. किरण बडाख, डॉ. अभिजीत चित्रक, शंकर गलांडे आदी ग्रामस्थांनी दिला आहे.