राधाकृष्णजी महाराज यांच्या कथेत चोरट्यांचा उच्छाद! एकाच दिवशी सात महिलांचे मंगळसूत्र लांबविले; चोरटी महिला अटकेत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पाच दिवसांपासून संगमनेरात सुरु असलेल्या जोधपूर निवासी राधाकृष्णजी महाराज यांच्या भागवत कथेत चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद घातला आहे. यापूर्वी गेल्या रविवारी एका महिलेच्या गळ्यातील 24 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबविण्याची घटना ताजी असतांनाच बुधवारी सायंकाळी कथा संपण्याच्यावेळी गर्दीचा फायदा घेत एकाचवेळी तब्बल सात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे रविवार आणि कालच्या बुधवारी घडलेल्या या घटनांमध्ये नागरीकांनी प्रत्येकी एका चोरट्या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यातही दिले, मात्र त्या उपरांतही कथेत सुरु असलेल्या चोर्‍यांना पायबंद घालण्यात पोलीस अपयशी ठरल्याने चोरट्यांवरील पोलिसांचा वचकच नष्ट झाल्याचे धडधडीत सिद्ध झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरातील प्रभात फेरी समूहाने 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत मालपाणी लॉन्स येथे जोधपूर निवासी, गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन केले आहे. श्रावणमासाचा महिना आणि त्यातच गेल्या दोन वर्षात कोविड संक्रमणामुळे धार्मिक कार्यक्रमांना मनाई होती. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर आयोजित झालेल्या या कथा यज्ञात संगमनेर व परिसरातील महिलांची मोठी गर्दी होत आहे. संगमनेर शहराला मोठा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असल्याने या आयोजनातून पवित्र श्रावणमासाच्या महिन्यात शहरातील वातावरण भक्तिमय झालेले असतांना त्याला आता चोरट्यांच्या दुष्कृत्यांनी गालबोट लागले आहे.

यापूर्वी कथेच्या तिसर्‍या दिवशी रविवारी (ता.7) कथा सुरु होण्याच्या वेळीच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संगमनेरातील शिला सुभाष मालाणी या भाविक महिलेच्या गळ्यातील 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडण्यात आले. संबंधित चोरटी महिला मालाणी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडीत असल्याची बाब त्यांच्या लागलीच लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या महिला व नागरिकांनी लागलीच एका महिलेला पकडले व तिच्याकडील मंगळसूत्रही ताब्यात घेतले. या घटनेनंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून नागरीकांनी पकडलेल्या मंजू बच्चुकुमार या मूळच्या राजस्थातील जयपूरमधील मात्र सध्या श्रीरामपूरमध्ये राहणार्‍या महिलेला अटक केली.

खरेतर या घटनेनंतर शहर पोलिसांनी राधाकृष्णजी महाराज यांच्या कथेला होत असलेली महिलांची गर्दी लक्षात घेवून आवश्यक तो बंदोबस्त देण्याची गरज होती. मात्र निष्क्रीयता अंगी भिनलेल्या पोलिसांनी फक्त कारवाईचा शो करीत चोरट्या महिलांच्या टोळीतील एक महिला नागरीकांनी पकडून दिल्यानंतरही योग्य तपास न केल्याने सदरील महिलेसोबत संगमनेरात येवून अशा प्रकारच्या चोर्‍या करणारी महिलांची टोळी मात्र मोकळीच राहीली. त्याचा परिणाम एक चोरटी महिला गजाआड जावूनही श्रावणाच्या पवित्र महिन्यात कथेचे पूण्य पदरी पाडण्याची आशा घेवून जाणार्‍या महिलांच्या मनातील चोरट्यांची दहशत कमी होण्याऐवजी वाढतच जाण्यात झाला.

पोलिसांच्या याच निष्क्रीयतेमुळे रविवारी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती अवघ्या तीनच दिवसांत पुन्हा एकदा झाली. यावेळी चोरट्या महिलांच्या टोळीने दुपार ऐवजी सायंकाळी डल्ला मारण्याचे नियोजन केले. त्यानुसार बुधवारी (ता.10) सायंकाळी कथा समारोपाच्यावेळी घरी परतण्याच्या गडबडीत असलेल्या भाविक महिलांच्या गर्दीत शिरुन पुन्हा या टोळीने उच्छाद घालतांना एक-दोन नव्हेतर तब्बल सात महिलांच्या गळ्यावर हात साफ करीत त्यांच्या गळ्यातील कमी-अधिक वजनाचे मंगळसूत्र व सोनसाखळ्या लांबविल्या. यावेळीही चोरट्यांची हालचाल जाणवल्याने विजया श्रीनिवास अनमल या भाविक महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणारी कौसल्या सर्जेराव गायकवाड (रा.खोकरमोहा, ता.शिरुर, जि.बीड) या महिलेला नागरिकांनी पकडले.

याप्रकरणी विजया अनमल यांची एकमेव तक्रार दाखल करण्यात आली असून उर्वरीत सहा महिलांना मात्र ‘उद्या या’ असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली आहे. यावरुन संगमनेरात पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे गुन्हे घडण्याचे सत्र थांबत नसतांना पोलिसच आता तक्रार घेण्याचे टाळून संगमनेरात ‘रामराज्य’ नांदत असल्याचे खोटे चित्र उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेने निष्क्रीय संगमनेर पोलिसांची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर लटकली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेरातील ढासळत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Visits: 79 Today: 1 Total: 1111304

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *