जिल्हाप्रमुखांची प्रतिमा दहन करणार्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल! शनिवारी सकाळी संगमनेरात घडला होता प्रकार; सोळा जणांविरोधात पोलिसांची कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने नवीन पदाधिकार्यांच्या निवडीवरुन सुरु केलेला धिंगाणा थांबता थांबत नसल्याचे चित्र सध्या शिर्डी लोकसभा मतदार संघात बघायला मिळत आहे. गेल्या शनिवारी खुद्द पक्षप्रमुखांच्या आदेशाने जाहीर करण्यात आलेल्या या निवडींवरुन कोपरगाव व अकोल्यात गदारोळ झाल्यानंतर शुक्रवारी पक्षाने नूतन पदाधिकार्यांच्या निवडीला स्थगिती दिली होती. मात्र आता या स्थगितीवरुनही विरोध सुरु झाला असून आज सकाळी काही संतप्त शिवसैनिकांनी शिवसेनेचे उत्तर नगरजिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली. मात्र आता हाच प्रकार ‘त्या’ शिवसैनिकांच्या अंगलट आला असून शहर पोलीस ठाण्यात बारा निष्पन्न नावांसह एकूण सोळा जणांवर मुंबई पोलीस अधिनियमांतंर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस शिपाई सचिन सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आज (ता.5) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्रिलोक कन्हैय्यालाल कतारी (रा.संजय गांधी नगर) यांच्या नेतृत्त्वाखाली अजीज याकुब मोमीन (रा.मोमीनपूरा), गोविंद अलका नागरे (रा.नेहरु चौक) व इतर 10 ते 12 जणांनी आपासातील राजकीय मतभेदाच्या कारणावरुन पोलिसांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा फोटो असलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बसस्थानकासमोरील चौकात दहन केले.

सध्या अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस अधिनियमाचे 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यानुसार कोणतीही व्यक्ति अथवा त्याच्या आकृत्या वा प्रतिमांचे प्रदर्शन, प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने विविध प्रसिद्धी माध्यमातून यापूर्वीच नागरीकांना सूचित केलेले आहे. असे असतांनाही त्रिलोक कन्हैय्यालाल कतारी (रा.संजय गांधी नगर) यांच्या नेतृत्त्वाखाली अजीज याकुब मोमीन (रा.मोमीनपूरा), गोविंद अलका नागरे (रा.नेहरु चौक), राजू सीताराम सातपुते (रा.सुकेवाडी), सचिन पावलस साळवे (रा.मालदाड रोड), अमोल डुकरे (रा.रंगार गल्ली),

शोएब मुजीब शेख (रा.देवी गल्ली), अक्षय बळीराम बिल्लाडे, विकास पांडूरंग डमाळे (रा.अकोले रोड), अक्षय गाडे (रा.तेलीखुंट), विजय भागवत (रा.इंदिरानगर) व वैभव अभंग (रा.इंदिरानगर) या निष्पन्न नावांसह अज्ञात 3 ते 4 जणांनी आपापसातील राजकीय मतभेदावरुन विनापरवाना बेकायदेशीरपणे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केले असे शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हंटले आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी वरील सोळा जणांविरोधात मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) चे उल्लंघन व 135 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या वृत्ताने जिल्ह्यातील शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

