देशभरासह संगमनेरातही कोविड विरोधातील लसीकरणाला सुरुवात! पहिल्या टप्प्यात संगमनेरातील पावणेतीन हजार आरोग्य सेवकांचे होणार लसीकरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरणाला आज देशभरातील विविध शहरांसह संगमनेरातही सुरुवात झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून या जागतिक महामारी विरोधात सुरु असलेल्या लढ्याचा आजचा निर्णायक दिवस असल्याने त्याचे साक्षीदार होण्यासाठी वरीष्ठ अधिकार्यांसह आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.छाया लोहारे यांना पहिली लस देवून या मोहीमेचा आज सकाळी शुभारंभ झाला.

केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार व पुरवठा केलेल्या लसींच्या संख्येनुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून राज्याला पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटकडून 9 लाख 63 हजार तर हैद्राबादच्या भारत बायोटेकडून कोव्हॅक्सिनचे 20 हजार लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हानिहाय लसीकरणाचे नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात कोविडचे संकटे उभे राहील्यापासून बाधितांची सेवा करणार्या शासकीय व खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका व अन्य आरोग्य कर्मचार्यांना लशीचा पहिला डोस दिला जाणार आहे, त्यानंतर चार ते सहा आठवडड्यांच्या दरम्यान दुसरा डोस देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्याला 13 जानेवारीरोजी सिरम इन्सिट्युटकडून 39 हजार लशीचे डोस उपलब्ध झाले आहेत. तत्पूर्वी जिल्हा यंत्रणेने तालुकानिहाय एकूण 31 हजार 196 आरोग्य कर्मचार्यांची नोंदणी शासनाच्या पोर्टलवर केली असून त्यात संगमनेरातील 2 हजार 750 जणांचा समावेश आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात बारा केंद्र निश्चित करण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय, पाथर्डी व कर्जत उपजिल्हा रुग्णालय, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, शेवगाव व राहाता येथील ग्रामीण रुग्णालयांसह अहमदनगर महापालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र व नागापूर नागरी आरोग्य केंद्र या बारा ठिकाणी दररोज शंभर जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 14 जानेवारी रोजीच या सर्व केंद्रांना लशींचा पुरवठा करण्यात आला आहे.

संगमनेरातील घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयालाही तिनशे लशींची खेप प्राप्त झाली असून, साठवणूकीच्या क्षमतेनुसार टप्प्याटप्प्याने त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. आज (ता.16) सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्या हस्ते या मोहीमेचा शुभारंभ झाला. यावेळी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी सीमा घोगरे, आरोग्य सहाय्यक विनायक वाडेकर, सतीश बुरंगुले, कैलास ढगे आदींसह शासकीय व खासगी क्षेत्रातील वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज दिवसभरात शंभर आरोग्य सेवकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहीमेच्या शुभारंभाची संगमनेरातील पहिली लस घेण्याचा बहुमान ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.छाया लोहारे यांना मिळाला. त्यापाठोपाठ कोविडच्या लढ्यात अगदी सुरुवातीपासून सेवा देणार्या संजीवन रुग्णालयाचे प्रमुख डॉ.जगदिश वाबळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.राजेंद्र के.मालपाणी आदींसह ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यदूतांना कोविशिल्ड लस देण्यात आली.

देशभरात आजपासून कोविड विरोधातील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या माध्यमातूून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. संगमनेरातही या मोहीमेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचार्यांना लशीचा डोस दिला जाणार आहे. यासाठी संगमनेरातील जवळपास पावणेतीन हजार कर्मचार्यांची पोर्टलवर नोंद करण्यात आली असून दररोज शंभर आरोग्यसेवकांना लस देण्याचे नियोजन केले आहे. लसीकरणामुळे कोविडचा प्रादुर्भाव रोखला जावून आरोग्य कर्मचार्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होणार आहे.
डॉ.शशीकांत मंगरुळे
उपविभागीय अधिकारी, संगमनेर

