शिवसेनेच्या दोघा बंडखोरांमध्ये रंगणार शिर्डी लोकसभा? लोखंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा; तर घोलपांना शिंदे गटाची उमेदवारी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दोन दशकांपासून संयुक्त शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील राजकीय चित्र विस्कळीत झाले असून राज्याच्या जागा वाटपातही शिर्डीच केंद्रस्थानी आली आहे. महायुतीच्या सूत्रानुसार शिर्डीची जागा शिंदे गटाकडे आहे. त्या पार्श्‍वभूमीवरच विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला होता. मात्र आता त्यांचाच पत्ता कट होणार असल्याचे संकेत मिळत असून नुकतेच शिंदे गटात सहभागी झालेले माजीमंत्री बबन घोलप आगामी निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या मतदार संघातील बदललेले राजकीय चित्र आपल्या फायद्याचे ठरेल असा कयास बांधून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांसह वंचित बहुजण आघाडीनेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शब्दावर ठाकरे गटात पोहोचलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांचीही कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


काँग्रेसचा बालेकिल्ला मानला गेलेला पूर्वीचा कोपरगाव आणि सध्याचा शिर्डी लोकसभा मतदार संघात 1996 साली पहिल्यांदाच भिमराव बडधे यांच्या रुपाने विरोधीगटातील भाजपचा उमेदवार निवडून आला. 1999 साली दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर बाजी मारुन लोकसभेत प्रवेश केला. 2009 साली मतदार संघांच्या पुनर्रचनेत शिर्डी लोकसभा मतदार संघाची निर्मिती होवून तो अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव झाला. त्यावेळी काँग्रेसने आठवले गटासाठी शिर्डीची जागा सोडल्याने पक्षाचे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले आपल्या कपबशी चिन्हासह मैदानात उभे ठाकले. त्यांच्या विरोधात शिवसेनेने साईबाबा संस्थानचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली.


त्या निवडणुकीत आठवलेंबाबत नकारात्मक प्रचार केला गेल्याने भाऊसाहेब वाकचौरे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवून शिर्डी लोकसभेवर शिवसेनेचा झेंडा फडकावला, तेव्हापासून हा मतदार संघ त्यांच्याच ताब्यात आहे. 2014 मध्ये देशात मोदी लाट जाणवत असतानाही दुर्बुद्धी सूचावी त्याप्रमाणे वाकचौरे यांनी शिवसेनेचा त्याग करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐनवेळी शिवसेनेला कर्जत-जामखेडचे भाजप आमदार सदाशिव लोखंडे यांना पक्षात घेवून उमेदवार द्यावा लागला. त्यावेळी अवघ्या दोन आठवड्यांच्या प्रचारातही लोखंडेंनी बाजी मारली. मात्र अकस्मात मिळालेल्या या संधीचे त्यांना सोनं करता आले नाही. जनसंपर्काचा अभाव, मतदार संघाशी दुरावा, कोणत्याही ठळक कामाची वाणवा अशा कितीतरी कारणांनी त्यांच्या विषयी नाराजी निर्माण झाली.


गेल्या पंचवार्षिक पर्यंत राज्यातील राजकारणातही मोठी उलथापालथ होवून निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील शिवसेनेची धुसफूस दिसू लागली होती. एकवेळ युती तुटणार असेही चित्र निर्माण झाले होते. राजकीय अनिश्‍चिततेतच झालेल्या त्या निवडणुकीतही लोखंडेंना मोदी लाटेने तारले आणि ते दुसर्‍यांदा लोकसभेत पोहोचले. मात्र ‘बोनस’ म्हणून मिळालेल्या या कार्यकाळाचाही त्यांनी पूर्वीप्रमाणेच वापर केल्याने त्यांच्या विषयीची नाराजी वाढली. याच दरम्यान 2014 साली पक्षाशी गद्दारी करुन काँग्रेसमध्ये गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा व्हाया भाजप असा प्रवास होवून ते स्वगृही परतले.


खासदार वाकचौरे यांच्या 2009 ते 2014 या कार्यकाळात त्यांनी प्रचंड जनसंपर्कातून आपला चाहता वर्ग तयार केला. ‘आपला माणूस, आपल्यासाठी’ असं ब्रीद ठरवून त्यांनी खेडोपाडीच्या रस्त्यांवर आपल्या वाहनाचे टायर झिझवले. खासदार निधीतून मंदिरे, समाज मंदिरांचा विकास साधण्यासह ग्रामविकासाच्या कामासाठीही त्यांनी निधी वाटला होता. त्याच आत्मविश्‍वासाच्या बळावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आला स्वतःचा घात करवून घेतला. मात्र आता त्यांची घरवापसी झाल्याने फूट पडूनही शिवसेनेला शिर्डीत आपलं पारडं जडं वाटतं आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून शिर्डीच्या जागेसाठी सतत आग्रह सुरु आहे. या जागेवर विद्यमान उमेदवार उभा राहिल्यास काय घडेल याबाबत भाजपने अंतर्गत सर्व्हे केल्याचे समजते. त्यातून खासदार लोखंडे यांच्याबाबतची नाराजीही समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत तिसर्‍यांदा उमेदवारी मिळवताना त्यांची दमछाक होणार हे निश्‍चित आहे.


लोखंडेंच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी देवळालीचे माजी आमदार बबन घोलप यांना शिर्डीच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्त करुन त्यांना जिल्ह्यात धाडले होते. त्याचवेळी घोलप यांनी शिर्डीच्या उमेदवारीचा शब्द घेतल्याचे बोलले जाते. तो पर्यंत भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्षात प्रवेश झालेला नव्हता. त्यामुळे ठाकरेंनीही ‘त्या दृष्टीनेच तयारी करा!’ असा आदेश त्यावेळी त्यांना दिल्याचे कळते. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच भाऊसाहेब वाकचौरेंना थेट मातोश्रीवर पक्षप्रवेश दिला गेल्याने घोलप दुखावले. त्याकडे दुर्लक्ष करीत पक्षाने त्यांच्या जागी सुनील शिंदे यांची संपर्क प्रमुखपदी नेमणूक करुन त्यांच्या जखमांवर मिठच चोळले. त्यामुळे त्यांनी आपल्या उपनेतेपदाचाही राजीनामा पाठवला, मात्र पक्षाने तो नामंजूर केला.


तेव्हापासूनच घोलप आपल्या ‘अटींसह’ शिंदे गटाशी वाटाघाटी करीत होते. या दरम्यान त्यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याने शिंदे गटाच्यावतीने शिर्डी लोकसभेची जागा बबन घोलपच लढवणार असल्याचे जवळजवळ निश्‍चित झाल्याचे दिसते. मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीकडून राज्यातील बारा जागांवर पेच कायम असून त्यात शिर्डीचा समावेश आहे. या जागेवर काँग्रेससोबतच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही दावा केला आहे. सद्य स्थितीत या मतदार संघातील राजकीय स्थिती आणि निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाल्यानंतरची स्थिती लक्षात घेता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची भूमिका महत्वाची ठरेल.

यापूर्वी सलग दोनवेळा निवडून आलेल्या लोखंडे यांच्या विजयामागे मोदींचाच करिष्मा होता हे खुद्द खासदारही नाकारणार नाहीत. वाकचौरेंनी गेल्या दशकभरात काँग्रेस, भाजप आणि अपक्ष असा प्रवास करुन घरवापसी केली. मात्र त्यांच्यामागे असलेला जनाधार आजही टिकून आहे का? याबाबत साशंकता आहे. दीर्घकाळ ‘गद्दार’ म्हणून त्यांच्या नावाचा जागर झाला असल्याने मतदारही त्यांना स्वीकारतील का हा देखील प्रश्‍न आहे. शिर्डीची जागा काँग्रेसच्या वाट्याला जाईल या भरवशावर दिवंगत प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या उत्कर्षा रुपवते जनसंपर्कावर भर देत आहेत. एकंदरीत शिर्डी लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची नामनिश्‍चिती मानली जात असून महाविकास आघाडीतील तिढा मात्र कायम आहे. त्यातच शिवसेनेसह काँग्रेस आणि वंचित आघाडीकडून दावेदारी करणार्‍या उमेदवारांनी जनसंपर्कही सुरु केल्याने घोलप विरुद्ध कोण? याबाबत चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.


यंदाही मोदी लाटेचा करिष्मा प्राप्त करण्याच्या लालसेने शिंदे गटात गेलेल्या विद्यमान खासदारांचे स्वप्नभंग होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी गेल्या दीड-दोन वर्षात खासदार निधीतून हायमास्ट, समाज मंदिरे यांना मदत करुन आपले नावही चर्चेत ठेवले आहे. वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवून त्यांनी गायब असलेला खासदार ही मतदार संघातील आपली ओळख पुसण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांच्याबाबत भाजपचा अंतर्गत सर्व्हे नकारात्मक असल्याचीही चर्चा आहे. अशा स्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवल्यास आश्‍चर्य वाटू नये अशीही जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. येणार्‍या काही दिवसांतच त्यातील सत्यही समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *