अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार काळेंनी केली पाहणी कोपरगावच्या तहसीलदारांसह मुख्याधिकार्यांना पंचनाम्याच्या केल्या सूचना
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरासह ग्रामीण भागात मागील दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात, व्यवसायिकांच्या दुकानात पाणी शिरले. शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची साईसंस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केली असून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कोपरगाव शहरासह मतदारसंघात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून शेतातील उभ्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार विजय बोरुडे यांना दिल्या आहेत. यापूर्वी अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्तांना मोठी नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.
त्याप्रमाणे झालेल्या नुकसानीची देखील जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करून एकही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. जेणेकरून सर्वच नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यास अडचणी येणार नाही. त्यासाठी सर्वच पंचनामे अचूक करावेत,अशा सूचना काळे यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत.