‘गुड्डी’ गायीची ढोलताशांच्या गजरात पाठवणी तब्बल 2 लाख 11 हजार रुपयांना झाली विक्री
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान येथील एका शेतकर्याची गाय तब्बल 2 लाख 11 हजार रुपयांना विकली गेली. गुलालाची उधळण करत ढोलताशांच्या गजरात ‘गुड्डी’ नावाच्या या गायीची पाठवणी करण्यात आली. गाय विक्रीची ही विक्रमी किंमत असून ही गाय दररोज 40 लिटर दूध देते.
सध्या विविध कारणांनी शेती करणे जिकरीचे झाले असले तरी शेतीला पूरक जोडधंदा केला तर आर्थिक प्रगती साधता येते. याचेच उत्तम उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात बघायला मिळाले आहे. टाकळीभान येथील प्रशांत, अमोल व राजेंद्र नागले या शेतकरी बंधूंनी काही वर्षांपूर्वी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय सुरू केला. मात्र आता नागले बंधूंचा हा मुख्य व्यवसाय झाला आहे. गोपालन व्यवसायात सातत्याने वाढ करून त्याचे मुख्य व्यवसायात रुपांतर केल्याने नागले यांच्या गोठ्यात दर्जेदार अशा 50 पेक्षा अधिक संकरीत गायी आहेत. नागले बंधूंनी स्वतःच्या शेतातच सुमारे दीड एकर जागेत मुक्त गोठा सुरू केलेला आहे. या गोठ्यात दर्जेदार वानाच्या गायींचे संगोपन केले जात असून दररोज सुमारे 450 ते 500 लिटर दूध वितरीत केले जाते.
नागले बंधूंच्या गोठ्यातील ‘गुड्डी’ नावाच्या संकरीत गायीची गोठ्यातच विक्री झाली. तब्बल 2 लाख 11 हजार 1 रुपयांना ही गाय राहाता तालुक्यातील सोनगाव येथील गायींचे व्यापारी नूर शेख यांनी खरेदी केली. आत्तापर्यंतच्या खरेदी-विक्रीतील ही उच्चांकी किंमत आसल्याचे बोलले जात आहे. दुसर्या विताची ही गाय दररोज सुमारे 40 लिटर दूध देते. या आगोदार नागले बंधूंच्या गोठ्यातील दररोज 35 लिटर दूध देणार्या ‘राणी’ नावाच्या गायीला 1 लाख 41 हजार रुपये तर ‘लक्ष्मी’ नावाच्या 30 लिटर दूध देणार्या गायीला 1 लाख 21 हजार रुपये विक्री किंमत मिळाली होती. विक्रीनंतर ‘गुड्डी’ या गायीची बसस्थानक परीसरातून भर पावसातही गुलालाची उधळण करीत व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर नागले बंधूंनी या गायीची पाठवणी केली. यावेळी टाकळीभान ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.