स्वातंत्र्यदिनी भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरणार? पावसाची संततधार पुन्हा सुरु; भंडारदरा व निळवंडे 88 टक्क्यांवर..

नायक वृत्तसेवा, अकोले
यंदाच्या वर्षी राज्यात अनेक ठिकाणी ढगफूटी सदृष मोठ्या प्रमाणात जलवृष्टी झाल्याने धरण व लाभक्षेत्राच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून जुलैतच भरण्याची शक्यता असलेल्या भंडारदरा व निळवंडे धरणाचा पाणीसाठा सर्वोच्च पातळीपासून रोखला गेला. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने बहुतेकवेळा 15 ऑगस्टपूर्वीच तुडूंब होणारी ही दोन्ही धरणं अद्यापही पूर्ण क्षमतेने भरण्यात आलेली नाहीत. मात्र गेल्या आठवड्यापासून या दोन्ही धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग अत्यल्प करण्यात आल्याने धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षीही भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.

वातावरणातील बदलांमुळे यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी धोऽ..धो.. पाऊस कोसळला. ज्या भागात जेमतेम सरासरी पाऊस होतो अशा भागांनाही यंदा अतिवृष्टीचा तडाखा बसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या मोठ्या धरणांच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही काही प्रमाणात अशीच स्थिती बघायला मिळाली. सुरुवातीच्या कालावधीत तर प्रचंड पावसाच्या पाणलोटात पावसाचा दुष्काळ असताना लाभक्षेत्रात मात्र जोरदार जलवृष्टी झाल्याचेही चित्र जिल्ह्याने बघितले. पाणलोट क्षेत्राला मोठी ओढ दिल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेर धरणार्‍या वरुणराजाने गेल्या महिन्याभरात धरणांचा पाण्याचा दुष्काळ दूर सारतांना अकोले तालुक्यातील सर्व लघु व मध्यम प्रकल्प ओसंडले, तर मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही धरणांची स्थिती समाधानकारक अवस्थेत पोहोचवली.

मात्र यावर्षी राज्यात ठिकठिकाणी पावसाने रुद्रावतार धारण केल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसह नदीकाठावरील लोकवस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं जुलैतच भरण्याची स्थिती निर्माण होवूनही प्रत्यक्षात तसे घडू दिले गेले नाही. वास्तविक जिल्ह्यातील या तिनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. त्यामुळे बहुतेकवेळा भंडारदरा धरण 15 ऑगस्टपूर्वीच पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी मात्र परिचालन सूचीचे तंतोतंत अनुपालन करण्यासह हवामान खात्याचा प्रत्येक इशारा गांभीर्याने घेण्यात आल्याने मध्यंतरीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस होवून राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होवूनही जिल्हा मात्र त्यापासून सुरक्षित राहील्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यापासून मात्र पाणलोटासह लाभक्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. धरण क्षेत्रात तर मध्यंतरी चक्क ऊन आणि सावल्यांचाही खेळ बघायला मिळाला. त्यामुळे भंडारदर्‍यातून निळवंडेत आणि निळवंड्यातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत असलेला विसर्ग सुरुवातीला पूर्णतः बंद करण्यात आला होता, मात्र गेल्या तीन दिवसांपासून धरणांच्या पाणलोटात पुन्हा संततधार सुरु झाल्याने भंडारदर्‍यातून 826 क्यूसेक तर निळवंड्यातून अवघे 690 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. प्रत्यक्षात सोडल्या जाणार्‍या पाण्यापेक्षा धरणात आवक होणारे पाणी अधिक असल्याने धरण व्यवस्थापनाकडून आता ही दोन्ही धरणं तुडूंब करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. येत्या आठ दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास स्वातंत्र्य दिनापूर्वीच भंडारदरा व निळवंडे धरणांचे पाणीसाठे सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.

गेल्या 24 तासांत भंडारदर्‍यात सर्वाधिक 374 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून त्यातील 71 दशलक्ष घनफूट पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे, तर 303 दशलक्ष घनफूट पाणी धरणातच अडविण्यात आले आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर भंडारदर्‍याचा पाणीसाठा आता पुढे सरकला असून सकाळी सहा वाजता तो 9 हजार 714 दशलक्ष घनफूटावर (88 टक्के) पोहोचला आहे. तर निळवंडे धरणातही चोवीस तासांत एकूण 109 दशलक्ष घनफूटाची आवक झाली, त्यातील 49 दशलक्ष घनफूट पाणी अडविण्यात आले तर 60 दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्राद्वारे सोडण्यात आले. या धरणाचा पाणीसाठा सध्या 7 हजार 379 दशलक्ष घनफूट (88.60 टक्के) इतका आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणातील पाणीसाठाही समाधानकारक स्थितीत पोहोचला असून सध्या धरणात 21 हजार 48 दशलक्ष घनफूट (80.95 टक्के) इतके पाणी आहे.

तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील पावसाला पुन्हा जोर चढला असला तरीही आढळा व म्हाळुंगी खोर्‍यातील पाऊस मात्र जेमतेमच असल्याने दोन दिवसांपूर्वी दुथडी वाहणार्‍या या दोन्ही नद्यांचे पात्र आता संकुचित होवू लागले आहे. आज सकाळी आढळा जलाशयातून नदीपात्रात पडणारे पाणी बंद झाले आहे, मात्र कालव्यांद्वारे 45 क्यूसेकने पाणी सुरु असून भोजापूर जलाशयाचा ओव्हर फ्लो देखील कमी होवून तो आता 539 क्यूसेकपर्यंत खाली आला आहे. संगमनेर तालुक्यातील ओझर बंधार्‍यावरुन आज सकाळी 1 हजार 476 क्यूसेकने जायकवाडीकडे पाणी सुरु होते, तर कोतुळनजीकच्या मुळापात्रातून 3 हजार 822 क्यूसेकचा प्रवाह धरणाकडे वाहत होता.

आज सकाळी सहा वाजता संपलेल्या 24 तासांत झालेला पाऊस पुढीप्रमाणे – घाटघर 139 मि.मी., रतनवाडी 121 मि.मी., भंडारदरा 107 मि.मी., वाकी 83 मि.मी., निळवंडे 25 मि.मी., आढळा 06 मि.मी., अकोले 12 मि.मी., कोतुळ 14 मि.मी., संगमनेर 04 मि.मी., श्रीरामपूर 09 मि.मी., शिर्डी 103 मि.मी. व राहाता 11 मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 29677

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *