मृत्यूच्या दाढेतून मुलाचा आईने वाचविला जीव! महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांकडून धाडसी मातेचा गौरव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोटच्या चार वर्षाच्या गोळ्याला बिबट्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी त्यावर त्वेषाने तुटून पडलेल्या आणि मृत्यूच्या दाढेतून मुलाची सुटका करणार्या धाडसी मातेचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खास भेट घेवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकताच गौरव करण्यात आला.
मागील आठवड्यात तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील माणकेश्वर मळा परिसरात ही थरारक घटना घडली होती. राहत्या घराजवळच्या शेतात जनावरांना घास कापण्यासाठी गेलेल्या कविता सागर खताळ यांचा चार वर्षांचा मुलगा घराकडून आईकडे चालला होता. सायंकाळच्या वेळी जवळच्या मक्याच्या शेतात भक्ष्याच्या शोधार्थ दबा धरुन बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या शिव या मुलावर हल्ला केला व त्याला सुमारे 200 फुटापर्यंत ओढून नेले. हे दृश्य पाहताच हाती गवसलेल्या काठीने त्याची आई कविताने बिबट्याला जोरदार प्रतिकार केला. जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या तोंडातून शिकार सोडवली. गंभीर जखमी झालेल्या शिववर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याला सुमारे 37 टाके पडले होते, आता त्याची प्रकृती सुधारली आहे. या घटनेनंतर कविता खताळ यांच्या धाडसाचे तालुक्यात कौतुक झाले होते. तालुक्याच्या दौर्यावर असलेल्या महसूल मंत्र्यांनी खताळ यांच्या घरी भेट देत, या मातेचे आवर्जून कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, मनीषा कोकणे, मुरली खताळ, अनिल काळे, रोहिदास खताळ, दत्तू कोकणे, शिवाजी वलवे, बाळासाहेब कानवडे, सरपंच रोहिदास खताळ आदी उपस्थित होते.