पठारावरील कळमजाई धबधब्याखाली बुडून तरुणाचा मृत्यू! आंबी खालसा परिसरात शोककळा; मित्रांसमवेत गेला होता आंघोळीला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे। क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे॥’ बालकवींनी आपल्या कवितेतून मांडलेले श्रावणातील निसर्गसौंदर्य मानवी मनाला सतत खुणावत असते. दोन महिन्यांच्या पावसात धरणीने नेसलेला हिरवागार शालू, झाडा-पानांच्या दाटीत गच्च झालेले डोंगर, कडेकपारीतून फेसाळत कोसळणारे धवल धबधबे आणि अल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी पावसाळ्यात अनेक कुटुंब सहलीला निघतात. मात्र निसर्गाच्या सानिध्यात जातांना त्याचे नियमही तितक्याच कटाक्षाने पाळावे लागतात, अन्यथा अशा ठिकाणी अपघातांची शक्यता पदोपदी दाटलेली असते. असाच दुर्दैवी प्रकार तालुक्याच्या पठारभागातून समोर आला असून आपल्या मित्रांसमवेत कळमजाई देवी मंदिर परिसरातील धबधब्याखाली आंघोळीसाठी गेलेल्या तरुणांमधील एका सतरा वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने आंबी खालसा परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण पठारभागातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पठारावरील आंबी खालसा येथील जहीर रफिक शेख हा सतरा वर्षीय तरुण आपल्या काही मित्रांसमवेत तेथून जवळच असलेल्या कळमजाई देवी मंदिराच्या परिसरात भटकंती करीत होता. यावेळी या सर्वांनी मंदिरालगत कोसळणार्या धबधब्यातून उडणार्या जलतुषारांची अनुभूती घेतल्यानंतर त्यांना धबधब्याच्या खालच्या बाजूस बांधलेल्या तळ्यात आंघोळीचा मोह झाला. त्यानुसार काही मित्र तळ्यात आंघोळीसाठी उतरले. काही वेळ आंघोळी केल्यानंतर त्यातील जहीर शेख हा अचानक गायब झाला. त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या मित्रांसह इतरांनी त्याचा शोध घेतला असता काही वेळाने तो बेशुद्ध अवस्थेत तळ्याच्या पाण्यात आढळला.

गेल्या दोन दिवसांत पठारभागात चांगला पाऊस झाल्याने कळमजाई येथील देवीचा धबधबा आवेशाने कोसळत आहे. त्यामुळे त्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून होणार्या सततच्या पावसामुळे या धबधब्याच्या अगदी खालच्या बाजूला देवीच्या मंदिरालगत असलेल्या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. याच तळ्यात जहीर शेख व त्याचे मित्र आंघोळीसाठी उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सदरची घटना समजताच तेथे उपस्थित असलेल्यांनी जहीरला पाण्याबाहेर काढून खासगी रुग्णवाहिकेद्वारा सुरुवातीला घारगाव येथील भंडारी रुग्णालयात तर त्यानंतर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी जाहीर केले. ऐन वयात आलेल्या तरुण मुलाचा अशाप्रकारच्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. जहीरच्या मृत्यूची बातमी त्याच्या आंबी खालसा या गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. घारगाव पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

