जेवण नाकारण्याच्या कारणावरुन ‘सेलिब्रेशन’मध्ये तरुणांची धुमश्चक्री! माजी नगरसेवकालाही तुडवले; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मारझोड थांबली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मित्रमंडळींसह सुरुची भोजनाचा आस्वाद घेण्याचा हेतू मनात घेवून काही तरुण अकोले रस्त्यावरील ‘सेलिब्रेशन’मध्ये पोहोचले. मात्र हॉटेल मालकाने वेळेचं कारण सांगत त्यांना भोजन नाकारले. त्यातून सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. हॉटेल चालकाने अधिक आक्रमकपणा दाखवल्याने हॉटेलमधील वेटर एकत्रित झाले व त्यांनी त्या तरुणांना धाकात घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून हाणामारीला सुरुवात झाली. एरवी संघटीत होवून हॉटेल कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना तुडविल्याची अनेक उदाहरणे ऐकली असतील, मात्र यावेळी उलटे घडले. हॉटेलच्या मालक आणि कर्मचाऱ्यांचा धाकात घेण्याचा प्रयोग त्यांच्याच अंगलट आला. आधीच संतप्त झालेल्या त्या तरुणांनी हॉटेल मालकासह सगळ्या वेटर्सना मनसोक्त मारहाण केली. यावेळी एका माजी नगरसेवकाने मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. संतप्त तरुणांनी त्यालाही यथेच्छ तुडविले. याप्रकरणी दोन्ही गटाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरच तरुणांकडून सुरु असलेली मारझोड थांबली.
गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेदहा नंतर सर्व आस्थापणा बंद केल्या जातात. हॉटेलसारख्या ठिकाणांना ही वेळ पाळताना साहजिकच मोठी कसरत करावी लागते. बंद करण्याची वेळ आणि त्यापूर्वीच बसलेल्या ग्राहकांना सुरु असलेली सेवा यांचा ताळमेळ जुळवताना हॉटेल सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे नवीन ग्राहक येतच असतात. अशावेळी अनेकदा जेवणासाठी दुसरा पर्याय नसल्याची जाणीव असलेल्या ग्राहकांशी वादही होतात. मात्र त्यात अतिरेक झाला की काय घडते हे सोमवारी रात्री अकोले बायपास रस्त्यावरील ‘सेलिब्रेशन’ या नावाजलेल्या हॉटेलमध्ये तरुणांनी उडविलेल्या धुमश्चक्रीतून दिसून आला.
काल रात्री पावणे अकरा वाजता अकोले रस्त्यावरील हॉटेल ‘सेलिब्रेशन मध्ये सहा तरुण जेवणासाठी आले होते. यावेळी वेळेचे कारण सांगत त्यांना जेवण नाकारण्यात आले. त्यातून हॉटेल मालक व तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्याचे पर्यावसान हाणामारी होण्यापर्यंत पोहोचल्याने सवयीप्रमाणे हॉटेलमधील वेटर्सनी संघटितपणे त्या सहा-सात तरुणांना गराडा घालून त्यांना धाकात घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी राबविलेल्या अशा अनेक प्रकारात फत्ते झालेली असल्याने यावेळी तसेच होईल असे समजून आक्रमक झालेल्या हॉटेलमधील मालक आणि कर्मचारी या दोघांनाही यावेळी मात्र वेगळाच अनुभव आला. या घटनेत संतप्त झालेल्या तरुणांनीच त्यांना झोडपायला सुरुवात केली. यावेळी हॉटेलमधील टेबल, खुर्च्या, प्लेट, चमचे, ग्लास-वाट्या यांचे काही प्रमाणात नुकसानही झाले. बराच वेळ ही धुमश्चक्री सुरु होती. या दरम्यान अनेकांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला, पण तो फोल ठरला.
एका माजी नगरसेवकालाही मारहाणीचा प्रकार समजल्यानंतर त्याने तातडीने हॉटेलमध्ये धाव घेऊन अधिकाराने हस्तक्षेप करीत प्रकरण नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेले तरुण अर्थातच जेवणासाठी आलेले ग्राहक भलतेच गरम झाले होते. त्यामुळे त्यांनी मध्यस्थाची भूमिका घेऊन आलेल्या त्या माजी नगरसेवकालाही येथेच्छ तुडवले. हा प्रकार सुरु असताना हॉटेलच्या बाहेर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच ‘त्या’ तरुणांचे अनेक मित्र त्या ठिकाणी जमा झाल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्हीही बाजूच्या प्रमुख व्यक्तींना पोलीस ठाण्यात नेवून तक्रार देण्याबाबत सूचित केले. मात्र दोन्ही गटाकडून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद झालेली नाही. मात्र या एकंदरीत प्रकाराची आणि त्या माजी नगरसेवकाच्या धुलाईची संगमनेरात जोरदार चर्चा सुरु आहे..
गेल्या काही दिवसात बी.एड् कॉलेज सर्कल जवळील परिसर म्हणून विकसित होत असल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ व हॉटेलची संख्या वाढत असल्याने या रस्त्यावरील ग्राहकांची रेलचेलही वाढली आहे. त्यात ‘सेलिब्रेशन’ हे अकोले रस्त्यावरील हॉटेल अनेकांसाठी पसंतीचे ठिकाण आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री जवळपास अर्धा तास सुरु असलेल्या या धुमाकूळात हॉटेलचा मालक, कर्मचारी व एका माजी नगरसेवकाची येथेच्छ धुलाई करण्यात आली. या घटनेनंतर अनेकांच्या मुखातून सदरील हॉटेलमध्ये असे प्रकार नियमित घडत असल्याचेही बोलले गेले.
Visits: 4 Today: 1 Total: 21176
Post Views:
158