शिंदेसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ कानकाटे यांचा राजीनामा! पक्षवाढीच्या आधीच फूटीला सुरुवात; अंतर्गत गटबाजीला वैतागले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटातून विस्तवही जात नसताना पोलिसांच्या खेळीने मात्र गुरुवारी संगमनेरात अभूतपूर्व प्रसंग घडला. त्याची शहर व तालुक्यात जोरदार चर्चा रंगलेली असतानाच निष्पाप पदाधिकारी म्हणून लौकीक असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी मात्र आपल्या पदाचा राजीनामा देत अनेकांना धक्का दिला. शहरातील शिवसेनेचे सगळे गट एकत्र होवून महाराष्ट्राच्या जाणता राजाचा जन्मौत्सव साजरा करीत असतानाच त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला वैतागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पदाचा राजीनामा पाठवला. त्यांच्या या अचानकच्या निर्णयाने शिंदेगटातही प्रामाणिकपणे काम करणार्यांना शून्य किंमत असल्याची बाबही आता चव्हाट्यावर आली आहे.
गुरुवारी (ता.28) संयुक्त शिवसेनेच्या पारंपरिक मिरवणुकीचा माहौल बदलला. पोलिसांच्या सूचनेनुसार शिवजयंतीची मिरवणूक काढणार्या सर्वांना एकच परवानगी देण्यात आल्याने त्याची जोरदार चर्चाही रंगली होती. प्रत्येक गटाचे समर्थकही आपापल्या गटाच्या बॅनरखाली एकवटल्याचे चित्रही यावेळी बघायला मिळाले. अशातच शिंदेसेनेचे संगमनेर तालुक्याचे शिलेदार दृष्टीत पडत असताना शहरातील पदाधिकार्यांची अनुपस्थिती मात्र सुरुवातीपासूनच खटकत होती. त्यामुळे मिरवणुकीच्या जल्लोशातही अनुपस्थित असलेल्या पदाधिकार्यांच्याच नावाची चर्चाही कानावर आली.
याच दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरप्रमुख असलेल्या सोमनाथ कानकाटे यांनी अचानक तडकाफडकी दिलेला पदाचा राजीनामा प्रसिद्धी माध्यमांकडे येवून धडकला आणि एकंदरीत चर्चेचा नूरच पालटला. कानकाटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात आपण पक्षासोबत कायम असल्याचा उल्लेख करताना अंतर्गत गटबाजी आणि हेतुपुरस्सर डावलण्याच्या पद्धतीमूळे आपण हताश झाल्याचे म्हंटले आहे. स्थानिक पक्षातंर्गत निर्णयातही आपल्याला सामावून घेतले जात नसून परस्पर निर्णय होत असल्याने शहरप्रमुख पद केवळ शोभेचे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर यापुढे पदावर काम करण्याची मानसिकता नसल्याचे सांगत आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे कानकाटे यांनी लिहिले आहे.
कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या सोमनाथ कानकाटे यांनी संयुक्त शिवसेनेत असताना अंतर्गत गटबाजीला वैतागून थेट राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. मात्र दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या दोन फाकळ्या झाल्यानंतर उभ्या राहिलेल्या शिंदेसेनेत आपल्याला न्याय आणि काम करण्यास वावही मिळेल या आशेने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन शहरप्रमुखाचे पद मिळवले. त्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करीत असताना त्यांना पूर्वीप्रमाणेच अनुभव येवू लागल्याने ते काहीसे थबकले होते, मात्र वरीष्ठांनी समजूत काढल्यानंतर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरु ठेवले.
मात्र हा समझौता फारकाळ टिकला नाही आणि तालुक्यातंर्गत शिंदेगटातही गटबाजीला ऊत येवू लागला. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनीही गटबाजीला प्रोत्साहन मिळेल अशाचप्रकारे कामकाज पुढे नेल्याने सोमनाथ कानकाटे दुखावले गेले. त्यातच शिवजयंतीची मिरवणूक शहरप्रमुखांचा अधिकार असतानाही त्यात तालुका पदाधिकार्यांनी हस्तक्षेप करुन आपला अर्ज दाखल केल्याने कानकाटे अस्वस्थ झाले आणि येथेच त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि ऐन शिवजयंतीच्या दिनीच तो उघडही केला.
शारदा नागरी सहकारी संस्था, संगमनेर मर्चन्ट्स बँक आणि भौमेजी महाराज मंडळाच्या माध्यमातून काम करताना कानकाटे यांनी आपला मोठा मित्रवर्ग निर्माण केला होता. 80 टक्के समाजकारण या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित असलेल्या कानकाटे यांनी याच कारणाने शिवसेना जवळ केली होती. मात्र साहेबांचा ‘तो’ विचार आता केवळ सांगण्यापुरताच शिल्लक राहिल्याने त्याचा परिपूर्ण अनुभव आल्यानंतर आता त्यांना संयुक्त शिवसेनेप्रमाणेच शिंदे शिवेसेनेच्या पदाचाही राजीनामा देण्याची वेळ आणली. त्यांच्या या निर्णयाने शहरातील अनेकांना धक्का बसला असून आगामी निवडणुकीत त्याचा फटका बसण्याचीही शक्यता आहे.
विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे पक्षात गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करीत गेल्याकाही कालावधीत शिर्डी लोकसभा मतदार संघात जिल्हाप्रमुखांसह अर्धाडझनहून अधिक पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मात्र यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने राजीनाम्याचे लोण आता संगमनेरातही येवून पोहोचले असून सोमनाथ कानकाटे यांच्या रुपाने एका सच्चा आणि प्रामाणिक शिवसैनिकाचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.