वाढदिवस कसा साजरा करावे याचे सर्वोत्तम उदाहरण ः थोरात उद्योजक मनीष मालपाणी यांचा वाढदिवस; एकावन्न हजार झाडांच्या रोपणाची संकल्पपूर्ती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जोपर्यंत आपल्याला ऊन्हाचा चटका बसत नाही, तोपर्यंत सावलीचे महत्त्वही लक्षात येत नाही. ज्यांना सावलीचे महत्त्व समजले त्यांनी केवळ आपला नाहीतर संपूर्ण समाजाचा विचार करावा ही खूप मोठी गोष्ट आहे. मनीष मालपाणी यांनी ध्यास घेवून पर्यावरण व वृक्षांविषयीचा कळवळा सिद्ध करताना कपारेश्वराच्या डोंगरावर 51 हजार झाडे लावण्याचा व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. या माध्यमातून अनेकांना सावली तर मिळणारच आहे, मात्र त्यातून पर्यावरण संवर्धनाचे जे काम घडले आहे ते खूप मोठे आहे. भविष्यात हा संपूर्ण परिसर संगमनेरातील पर्यटनाचे सर्वांग सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाईल असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर येथील उद्योजक मनीष मालपाणी यांनी खांडेश्वराच्या ‘वन ट्री’ टेकडीवर 51 हजार झाडे लावण्याचा व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला होता, त्याच्या पूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सुवर्णा मालपाणी, राजेश, डॉ. संजय, मनीष व गिरीश मालपाणी, ज्येष्ठ कार्यकर्ते लहानूभाऊ गुंजाळ, डॉ. विलास सपकाळ, अॅड. मधुकर गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, खांडगावचे सरपंच भरत गुंजाळ, अर्चना बालोडे व सोमनाथ गुंजाळ आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना थोरात म्हणाले की, संगमनेरातील अतिशय चैतन्यमयी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणार्या मनीष मालपाणी यांनी निर्माण केलेल्या निसर्गरम्य ठिकाणावरील आजचा हा कार्यक्रम कायम स्मरणात राहील. वाढदिवस कसा साजरा करायचा याचे आदर्श उदाहरण त्यांनी यानिमित्ताने निर्माण केले आहे. पाण्याच्या अभावाने व वृक्षारोपणानंतर त्याकडे लक्ष न दिल्याने दरवर्षी हजारो झाडे जळून जातात. मात्र मनीष मालपाणी यांनी केवळ वृक्षारोपणापर्यंतच न थांबता इतक्या मोठ्या प्रमाणात लावलेली झाडे जगावी यासाठी मोठा खर्च करुन ड्रीपच्या सहाय्याने त्यांना पाण्याचा पुरवठा केला. त्यामुळे गेल्या काही कालावधीत कपारेश्वराची ही टेकडी वृक्षराजीने फुलली असून भविष्यात हा परिसर पर्यटनाचे रम्य ठिकाण म्हणून समोर येईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी मालपाणी यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील अशा विविध टेकड्या सामाजिक संस्थांना दत्तक देवून त्यांच्या विकासाचा उपक्रमही राबविला गेल्याचे त्या म्हणाल्या. अभियानातून कपारेश्वराच्या डोंगरावर सातत्याने बिया पेरल्या गेल्या, मात्र यापूर्वी अनेकदा या डोंगरावर वणवा पेटून त्यात डोंगरावरील असंख्य झाडे जळून गेल्याचे सांगताना मनीष मालपाणी यांनी मात्र अशा घटना टाळण्यासाठी या परिसरात वाढलेले गवत काढून टाकल्याने वणवा पेटण्याची शक्यता जवळपास संपल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्तविक करताना राजेश मालपाणी यांनी मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व विशद् केले. मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने दरवर्षी अशाप्रकारचे उपक्रम राबविले जात असल्याचे ते म्हणाले. निसर्ग संतुलन साधण्यासाठी मालपाणी परिवाराने हरित ऊर्जा क्षेत्रातही मोठे काम केले असून वेगवेगळ्या आठ राज्यातील पवन व सौर ऊर्जा उपक्रमांच्या माध्यमातून दरवर्षी सात लाख टन कोळशाची बचत झाली आहे. त्यातून जवळपास आठ कोटी झाडे वर्षभरात जेवढ्या ऑक्सिजनची निर्मिती करतील तेवढे मोठे काम या प्रकल्पांमधून घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मानवाला दररोज 18 लाख लिटर ऑक्सिजनची गरज असते, त्याचे महत्त्व गेल्या दोन वर्षांच्या कोविड काळाने आपल्याला दाखवून दिले आहे. आपण एक झाडं लावले आणि त्याचे संगोपन केले तर त्यातून वर्षभरात आपल्याला 30 लाख रुपयांचा ऑक्सिजन अगदी मोफत मिळतो असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सत्कारमूर्ती मनीष मालपाणी यांनी दंडकारण्य अभियानातून प्रेरणा घेवून संगमनेरात वृक्षारोपनाची चळवळ उभी राहिल्याचे सांगितले. दरवर्षीच्या वाढदिवशी शे-दोनशे झाडे लावून तो साजरा करण्यास आपण सुरुवात केली. मात्र कालांतराने लक्षात आले की यातून किती झाडे लावली जातील आणि पर्यावरणाचा बिघडलेला समतोल कसा पूर्ववत होईल. त्यासाठी सुरुवातीला सायखिंडी शिवारातील खंडोबाचा डोंगर आणि खांडगाव परिसरातील एका टेकडीवर प्रत्येकी पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही केल्याचे ते म्हणाले.
![]()
गेल्या वर्षी कपारेश्वराच्या डोंगरावर 51 हजार झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केल्याचे सांगताना त्यासाठी 30 लाख रुपयांचा खर्च करुन सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात ठिबक सिंचनाचे जाळे पसरले आणि प्रत्येक झाडाला दररोज पाणी मिळेल याची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले. या उपक्रमात अनेक अडचणी आल्या मात्र वन विभाग असो अथवा खांडगावचे ग्रामस्थ या सगळ्यांनी साथ दिल्याने सुरुवातीला अशक्य वाटणारा हा उपक्रम आज पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्यसही झाडाला तीन वर्ष सांभाळले की त्यांचर पुढील वाढ आपोआप होते. त्यामुळे येथील उपक्रम पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील अन्य एखाद्या टेकडीवर याच ठिबक सिंचनाचा वापर करुन असाच उपक्रम राबविणार असल्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मनीष मालपाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहरासह खांडगावमधून आलेल्या विविध मान्यवरांनी व संस्थांनीही त्यांच्या या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. मुरारी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.
