अकोले पोलीस ठाण्यासमोर स्वातंत्र्यदिनी महिला करणार उपोषण शहरातील शाहूनगरमधील अवैध दारुविक्री बंद करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
शहरातील शाहूनगरमध्ये अवैध दारुमुळे आत्तापर्यंत 23 व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत. अनेकदा तक्रारी करूनही 400 कुटुंबाच्या या छोट्या वस्तीत अजूनही 7 ठिकाणी अवैध दारु विकली जाते. त्यामुळे अनेक तरुण मृत्यूच्या दारात आहेत. तेव्हा ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू दारुच्या व्यसनाधिनतेमुळे झाला आहे. त्या विधवा महिला 15 ऑगस्टपासून अकोले पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसणार आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, उत्पादन शुल्क आयुक्त यांना देखील निवेदन पाठवून संगमनेर येथील उत्पादन शुल्क अधिकारी व अकोलेचे पोलीस निरीक्षक यांच्यावरही या दारुविक्रीची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच दारुविक्रेत्यांना अटक करून तालुक्यातून तडीपार करावे, इंदोरी फाटा, वीरगाव फाटा येथील हॉटेल व अकोल्यातील ज्या देशी दारु दुकानातून शाहूनगरमध्ये दारु येते त्यांचे परवाना रद्द करावे व रोज गुंजाळवाडी, संगमनेरवरून अकोल्यात येणार्या दारुच्या गाड्या पकडून दलालांना अटक करावी अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. याबाबत अनेकदा पोलीस निरीक्षकांकडे तक्रार केल्या आहेत. परंतु, त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आल्याने अवैध धंदेचालकांचे फावत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, अॅड. वसंत मनकर, शांताराम गजे, भाऊसाहेब मंडलिक, बबन तिकांडे, प्रमोद मंडलिक यांनी दिले.