पेटीट कॉलेजसमोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी विद्यार्थ्यांसह कर्मचार्यांना त्रास; व्यावसायिकांशी होतेय हुज्जत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील बसस्थानकासमोर एका वृद्धेचा बळी गेला आहे. दिवसेंदिवस वाहनांची वाढत चाललेली संख्या व त्यातच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा केलेले अनधिकृत अतिक्रमण हेच अनेक निरपराध लोकांच्या जीवावर उठले आहे. अकोले बाह्यवळण रस्त्यावरील पेटीट कॉलेजसमोरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी व भाजी विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमणही भविष्यात कुणाचा तरी बळी घेऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी कॉलेज व परिसरातील नागरिकांतून होत आहे.
यापूर्वी या परिसरात अनेक छोटे-मोठे अपघात होऊन कुणी गंभीर जखमी तर काहींना जीवही गमवावा लागलेला आहे. सध्या पहिली ते बारावी व बी. एड. कॉलेजचे वर्ग सुरू झाले आहेत. या परिसरात नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येथील शालेय प्रशासनाने यापूर्वीच संगमनेर नगरपालिकेला व पोलीस प्रशासनाला बी. एड. कॉलेजसमोरील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली आहे. शिवाय या गर्दीचा फायदा घेऊन बाहेरील काही टारगट तरुणही महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी करतात. छोटे-मोठे व्यावसायिक तर सकाळपासूनच महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत आपले व्यवसाय सुरू करतात. याचा विद्यार्थ्यांसह कर्मचार्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी या व्यावसायिकांबरोबर कर्मचार्यांना हुज्जतही घालावी लागत आहे.
विद्यार्थ्यांना कॉलेज सुटल्यावर प्रवेशद्वारातून बाहेर निघणेही मुश्कील होत आहे. कारण प्रवेशद्वारासमोरच भाजीविक्रेते दुपारपासूनच आपले बस्तान मांडून बसत आहे. तरी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन बी. एड. कॉलेज समोरील रस्ता कायमस्वरुपी अतिक्रमणमुक्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांसह प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर, प्राचार्य एच. आर. मोकळ, मुख्याध्यापिका स्नेहल म्हाळस, इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी केली आहे.