शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा ‘शो’ एका दिवसाचा! पुन्हा परिस्थिती जैसे थे; निष्क्रीय अधिकार्‍यांचा सामान्यांच्या जीवाशी खेळ सुरुच

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोनच दिवसांपूर्वी संगमनेरच्या बेशिस्त वाहतूक व्यवस्थेने एका 64 वर्षीय महिलेचा बळी घेतल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेल्या संगमनेर पोलिसांची कार्यतत्परता अवघ्या दोन दिवसांतच संपुष्टात आली आहे. मंगळवारी बसस्थानकासमोर झालेल्या अपघाताला या परिसरातील बेकायदा वाहनतळ आणि थेट रस्त्यापर्यंत बोकाळलेली अतिक्रमणं कारणीभूत होती. त्याबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर संगमनेर शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले खरे मात्र त्यांची ही कार्यतत्परता केवळ एका दिवसाचा ‘शो’ ठरली. बुधवारपासून या भागातील बेशिस्ती पुन्हा एकदा पूर्ववत झाली असून खासगी प्रवासी व मालवाहतूक वाहनांसह अतिक्रमणांची परिस्थितीही जैसे थे झाली आहे. यावरुन निष्क्रीय असलेले काही अधिकारी सर्वसामान्य नागरीकांच्या जीवाशी खेळत असल्याचेही आता उघड झाले आहे.

गेल्या मंगळवारी (ता.2) संगमनेर बसस्थानकाच्या समोरील बाजूस मोपेडवरुन प्रवास करणार्‍या वृद्ध दाम्पत्याच्या वाहनाला मालट्रकचा धक्का लागून पाठीमागे बसलेल्या विमल कारभारी शिंदे या 64 वर्षीय महिलेचा बळी गेला. सदरचा अपघात या भागात उभी राहणारी श्रीरामपूरची खासगी व स्थानिक मालवाहतूक वाहने आणि अतिक्रमणांमुळे घडला होता. सदरची वाहने अधीच अरुंद असलेल्या महामार्गावरच उभी रहात असल्याने महामार्गावरुन जाणार्‍या वाहनांच्या चालकांना येथून पुढे जाताना मोठी कसरत करावी लागते. असाच प्रकार मंगळवारीही घडला होता.

कारभारी सोन्याबापू शिंदे (वय 72, रा.ओझर खुर्द) हे आपली पत्नी विमल यांच्यासह नाशिकच्या दिशेने संगमनेरकडे येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने चुकीच्या बाजूने पालिकेचा कचरा संकलित करणारा ट्रॅक्टरही येत होता. रस्त्याच्या बाजूला उभी असलेली वाहने व अतिक्रमित दुकानांसमोर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांमुळे ट्रॅक्टर चालकाला भर रस्त्यावरुन आपले वाहन घ्यावे लागले. त्याचवेळी समोरुन आलेल्या मोपेडला त्याच्या पाठीमागून आलेल्या मालट्रकचा धक्का लागला आणि काही समजायच्या आंतच मोपेडवरील वृद्ध दाम्पत्य वाहनासह खाली पडले. या अपघातात कारभारी शिंदे रस्त्यावरील मोकळ्या जागेत तर त्यांची पत्नी विमल मात्र थेट मालट्रकच्या चाकाखाली सापडली आणि जागीच ठार झाली.

या घटनेनंतर अचानक ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आलेल्या संगमनेर पोलिसांनी तत्काळ पालिकेच्या अतिक्रमण विभागाशी संपर्क साधून पथक बोलावले व बसस्थानकाच्या समोरील बाजूस जेथे अपघात घडला तेथील किरकोळ अतिक्रमणं हटवित तेथे बेकायदा तळ निर्माण करुन उभ्या असलेल्या खासगी प्रवासी व मालवाहतूक वाहनांना हुसकावून लावले. त्यामुळे सकाळी अपघात घडलेला हा रस्ता घटनेनंतर काही वेळातच प्रशस्त आणि मोकळा दिसू लागला. याबाबत बोलताना शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख सदर घटनेची पोलिसांनी दखल घेतल्याचे सांगत वाहतूक शाखेत मनुष्यबळ वाढवून आजपासूनच वाहतुकीसाठी विशेष काम करणार असल्याचे सांगितले.

मात्र त्यांचे हे आश्वासन केवळ एका दिवसाचा ‘शो’ असल्याचे आता उघड झाले असून ज्या कारणांनी अपघात घडला आणि त्यात एका निष्पाप महिलेचा बळी गेला तशीच परिस्थिती अवघ्या 24 तासांतच पुन्हा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेत मनुष्यबळ वाढवण्याची वल्गना झाल्यानंतर आज (ता.4) या परिसरात कायम तळ ठोकून बसलेले होते ते वाहतूक पोलीस कर्मचारीही जागा सोडून गायब झाल्याचे तर 48 तासांपूर्वी हुसकावून लावलेले खासगी वाहतुकदार आपली कायमची बेशिस्ती सोबत घेवून आपल्या ठरलेल्या आणि पोलीस अधिकार्‍यांनी आंदन समजून दिलेल्या ‘हक्का’च्या तळावर बिनधास्त ‘श्रीरामपूर.. लोणी.. बाभळेश्वर’च्या हळ्या देत असल्याचे दुर्दैवी दृश्य दिसत होते. यावरुन वारंवार लोटांगण घालीत राजकीय आशीर्वाद प्राप्त करणारे काही अधिकारी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असल्याचेही स्पष्ट दिसून आले.

मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी मालट्रकच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फूटेजवरुन सदर मालट्रक चालकापेक्षा विरुद्ध बाजूने शिरलेल्या पालिकेच्या कचरा ठेकेदाराच्या ट्रॅक्टरमुळेच हा अपघात घडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी खर्‍या दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. या प्रकरणात पोलिसांनी कचरा ठेकेदाराला वाचवण्याचाच प्रयत्न केल्याचेही आता स्पष्ट झाले असून राजकीय अशीर्वादाने ‘बेफाम’ झालेले काही अधिकारी मनाला वाटेल तसा कायद्याचा वापर करीत असल्याचेही यावरुन दिसून येत आहे.

Visits: 175 Today: 1 Total: 1112500

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *