कोपरगाव तालुक्याच्या बाधित रुग्णसंख्येत आठ रुग्णांची भर! तर कोविडचा पराभव करणार्या दुप्पट रुग्णांना आजच मिळाला डिस्चार्ज
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील कोविड बाधितांच्या संख्येत दररोज कमी-अधिक प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक यंत्रणेकडून विविध उपाययोजनांसह मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा निष्कर्षही काढण्यात येत आहेत. त्यातूनच तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडत असल्याचे समोर आले आहे. आजही रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या मात्र त्यातून एकही रुग्ण समोर आला नाही, मात्र शासकीय प्रयागशाळेच्या अहवालातून शहरासह तालुक्याच्या रुग्णसंख्येत आठ रुग्णांची भर पडल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडत आहे. प्रशासनाकडून सध्या मो÷या प्रमाणात रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जात असल्याने ही रुग्णवाढ दिसत आहे. अवघ्या पंधरा मिनिटांतच स्त्राव नमुन्याचा चाचणी अहवाल देणार्या या चाचणीतून झटपट रुग्णाची ओळख पटवून त्याला समूहापासून विलग करणं हा त्यामागील हेतू आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने आज पंधराजणांची रॅपिड अँटीजेन चाचणी घेतली, सुदैवाने त्या सर्वांचे निष्कर्ष नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहेत.
तर, सोमवारी अहमदनगरच्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या स्त्राव नमून्यांचे निष्कर्ष हाती आले असून त्यातून कोपगराव तालुक्यात नव्याने आठ जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. या अहवालातून लक्ष्मीनगर भागातील दोन, कोळपेवाडीतील दोन, करंजी, टाकळी फाटा, संजयनगर व धामणगाव येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासोबतच संक्रमिताच्या संपर्कात आलेल्यांसह लक्षणे दिसून आलेल्या 39 जणांचे स्त्राव घेवून ते आज तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, बुधवारी (ता.9) त्याचे अहवाल प्राप्त होतील अशी माहिती फुलसौंदर यांनी दैनिक नायकला दिली.
दिलासादायक..
जिल्ह्यासह तालुक्यातील कोविड संक्रमितांची संख्या वाढत असली तरीही त्यातून बरे होवून घरी परतणार्यांची संख्याही वाढत आहे. आजही एकीकडे तालुक्याच्या रुग्णसंख्येत आठ रुग्णांची भर पडलेली असतांना दुसरीकडे उपचार पूर्ण करुन घरी परतणार्यांची संख्या त्याच्या दुप्पट म्हणजे 17 इतकी होती. कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर कोपरगावकर कोविडला नक्कीच हद्दपार करु शकतील.