करजगाव उपकेंद्रातील शेतकर्यांचा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करा! भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची नेवासा महावितरणला निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील करजगाव येथील वीज उपकेंद्रांतर्गत शेतकर्यांचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता शरद चेचर यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करजगाव वीज उपकेंद्रांतर्गत गावातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे या भागातील शेतीसह जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकर्यांची दयनीय झालेली अवस्था लक्षात घेता खंडीत वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी उपविभागीय अभियंता शरद चेचर, अभियंता मनोहर पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
दरम्यान, कोणतीही नोटीस न देता करजगाव उपकेंद्रातून वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने पिके अजून निघालेली नसताना तसेच वीजबिल दुरुस्त झाले नसल्याने शेतकरी वीजबिल भरू शकत नाही. बिल दुरुस्ती होइपर्यंत खंडीत झालेला वीज पुरवठा त्वरीत सुरू करावा अशी मागणी करत या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिला आहे. सदर निवेदन देतेवेळी युवा मोर्चा जिल्हा सचिव महेश पवार, पाराजी गुडदे, नितीन पवार, बाळासाहेब क्षीरसागर, ज्ञानेश्वर माकोणे, प्रशांत बहिरट यांच्यासह या भागातील शेतकरी उपस्थित होते.