राजकीय द्वेषातून आमदार बदनामी करत आहे ः पिचड शासकीय दौर्यावरुन माजी आमदारांनी विद्यमान आमदारांवर केली टीका
नायक वृत्तसेवा, अकोले
कोणताही शासकीय दौरा नसताना अधिकार्यांना वेठीस धरून पुढे पोलीस गाडीचा सायरन वाजवून आश्रमशाळांची तपासणी करताना वस्तुस्थितीचा विपर्यास करून तालुक्याचे आमदार चमकोगिरी करीत आहे. केवळ राजकीय द्वेष मनात बाळगून अपुर्या माहितीवर बदनामी करत आहे. यावरुन अडीच वर्षे झोपा घेत होते काय? असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी केला आहे.
अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी शासकीय दौरा या गोंडस नावावर कोहणे, कोथळा आश्रमशाळांवर जाऊन तेथील परिस्थितीबाबत सोबत नेलेल्या पत्रकारांना फोटो काढण्यास लावून सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली तर माजी आमदार वैभव पिचड यांच्या आश्रमशाळेत जाऊन तेथील पाहणी केली. यासोबतच आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्यांना आदेश दिले. मुंबई येथून माजी आमदार वैभव पिचड राजूर येथे आले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्यांचे भात पीक नष्ट झाले. यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले, त्यांना मदत मिळणे आवश्यक असताना आमदारांनी केवळ हातात भात पिकाचा चुडा घेऊन फोटो सेशन करण्यात धन्यता मानली.
शासकीय आश्रमशाळा वसतिगृहामध्ये चांगले जेवण मिळणे आवश्यकच आहे. मात्र गेली अडीच वर्षे लोकप्रतिनिधी आदिवासी विकास प्रकल्प समितीचे अध्यक्ष असताना कोहणे आश्रमशाळेत पिण्यासाठी पाणी नाही, कर्मचारी नाही, सुविधांचा अभाव असताना जिल्हा परिषद सदस्य हेच व आमदारही हेच मग इतके वर्षे तपासणीसाठी लागले कसे याचा अर्थ आदिवासी विद्यार्थ्यांकडे यांचे किती लक्ष्य आहे हे दिसून येते. कोथळा आश्रमशाळा ही अनुदानित असली तरी डीबीटी योजना बंद आहे. संस्था विद्यार्थ्यांना सुविधा पुरवते याचा अभ्यास करणे आवश्यक असताना केवळ विरोधकांची संस्था या राजकीय द्वेषापोटी आमदार काम करत आहे. कोथळा शाळेतील विद्यार्थ्यांना दुसर्या शाळेत प्रवेश घ्या, विद्यार्थ्यांना दरडावून विचारणा करणे, त्यांना भयभीत करणे, संस्थेची शाळेची बदनामी करणे हे कोणत्या तत्वात बसते. तालुक्याचा विकास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला मग आश्रमशाळेत असणार्या असुविधांबाबत निधी उपलब्ध करून हा प्रश्न का सोडविला नाही. स्वतःला एक शाळा काढता आली नाही. मात्र गोरगरीब, उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून काम करत असताना हे महाशय शाळा, संस्था बंद कशी करता येईल यावर डोळा ठेवून आहे. विरोध केवळ व्यक्तीद्वेष समोर ठेवून होत असेल तर सहन केले जाणार नाही असा इशाराही माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला आहे.