वाकडीमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पदाधिकार्यांनी लक्ष द्यावे ः शेळके
वाकडीमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पदाधिकार्यांनी लक्ष द्यावे ः शेळके
स्वाभिमानी, प्रहार व स्थानिक शेतकर्यांच्यावतीने तहसीलदारांसह कृषी अधिकार्यांना निवेदन
नायक वृत्तसेवा, राहाता
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोना संकटामुळे शेतकर्यांचे अक्षरशः आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पिके पाण्यात उभी आहेत. शेतकर्यांनी कर्जे काढून पिके उभी केली आहे. दरम्यान, वाकडी परिसरात मागील वर्षी शासनाने पंचनामे करण्यास टाळाटाळ केली होती. यावर्षीही तीच परिस्थिती आहे. तरी या संदर्भात स्थानिक राहाता तालुक्यातील राजकीय नेते, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन शेतकर्यांच्या न्यायाची भूमिका घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल शेळके यांनी नुकतीच तहसीलदार व तालुका कृषी अधिकार्यांकडे केली आहे.

पुणतांबा महसूल मंडलमधील आजूबाजूच्या गावातील नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप वाकडीत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती प्रहार संघटना व स्थानिक शेतकर्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हंटले आहे की, गावातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. ऊस, सोयाबीन, मका, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु वाकडी गावातील शेतकर्यांचे पंचनामे अद्यापही सुरू केलेले नाहीत. स्थानिक शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत. तसेच मागील वर्षाचे फळबाग विमा व 465 शेतकरी अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहे. वाकडीत अतिवृष्टी होऊन कुठल्याही पंचनाम्याची कार्यवाही झाली नाही. उसाचे पंचनामे करण्यात आले परंतु तेही अल्पप्रमाणात. तसेच चालू वर्षाचे 2020-21 चे अनुदान देण्यासंदर्भात पुणतांबा मंडलाधिकारी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला असल्याचे म्हंटले आहे.

सदर निवेदनावर प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष जालिंदर लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल शेळके, प्रताप जाधव, भास्कर कोते, हरिभाऊ गोरे, अशोक कोते, नितीन साब्दे, भाऊसाहेब एलम, पंडित भवर, संजय कोते, मच्छिंद्र काळे, पोपट काळे व शेतकरी उपस्थित होते.

