संगमनेरच्या कारागृहात क्षमतेहून दुप्पट बंदीवान! तुरुंगाचा झाला खुराडा; बंदीवानांमध्ये आजाराच्या तक्रारीही वाढल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वेगवेगळ्या कारणांवरुन सतत चर्चेत असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याने आता पुन्हा एकदा जिल्ह्याचे लक्ष्य आपल्याकडे वेधले आहे. जिल्ह्यातील वैभवशाली शहर म्हणून मिरवणार्या संगमनेरच्या कारागृहांची अवस्था सध्या चर्चेत आली असून नव्याकोर्या इमारतीत असलेल्या या कोठड्या क्षमतेपेक्षा अधिक बंदीवानांमुळे कालकोठड्या ठरत आहेत. त्यामुळे एकाच कोठडीत जवळपास दुप्पट क्षमतेने असलेले बंदीवान दाटीवाटीने एक एक दिवस काढीत असल्याचे भयानक चित्र सध्या संगमनेरच्या कारागृहात दिसत आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या दोन्ही मजल्यांवर मिळून आठ कोठड्या असतानाही त्यातील केवळ चारच कोठड्या वापरल्या जात आहेत.

अहमदनगर शहराला साडेपाचशे वर्षांचा तर संगमनेर शहराला 2200 वर्षांचा इतिहास आहे. अगदी प्रागैतिहासापासूनच अस्तित्त्वात असलेल्या संगमनेरातील काही पौराणिक घटनांचा उल्लेख थेट मत्स्यपुराणातही आढळतो. यावरुन संगमनेर शहराचे प्राचिनत्त्व सहज लक्षात येते. प्राचिन कालावधीपासून अमृतवाहिनी प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर वसलेल्या या शहराने देवाधिकांसह सुलतानांच्या भयानक राजवटी आणि स्वराज्याचा अमृत अनुभवही घेतला आहे. त्यामुळे शेकडो वर्षांपासून संगमनेरच्या नावाला वेगळे वलय निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर अस्तित्त्वात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रगतशील आणि आघाडीचे शहर म्हणूनही संगमनेरचा वेगळा दबदबा आहे. येथील सुसंस्कृत वातावरणाने परिसरातील नागरी वसाहतींमध्ये मोठी भर घालण्याचे काम केले आहे.

आता जेथे वैभव आणि संपन्नता तेथे गुन्हेगारी प्रवृत्ती आपोआपच येणार. त्यानुसार गुन्हेगारी प्रवृत्तींचाही येथे मोठा वावर आहे. त्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे महत्त्वही आपोआपच अधोरेखीत होणारे आहे. पूर्वी शहर पोलीस ठाण्याची इमारत ब्रिटीशकालीन कौलारु स्वरुपाची होती. दशकभरापूर्वी तहसील इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले तेव्हा शहर पोलीस ठाण्याला स्वतंत्र आणि दोन मजल्यात विभागलेली मोठी इमारत मिळाली. या दोन्ही मजल्यांवर प्रत्येकी चार याप्रमाणे आठ कोठ्यांचीही रचना करण्यात आली होती. खालच्या मजल्यावरील कोठड्यांमध्ये पोलीस कोठडीतील तर वरच्या कोठड्यांमध्ये न्यायालयीन कोठडीतील बंदीवानांना ठेवण्याचीही सोय करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी वरच्या मजल्यावरील चारही कोठड्यांचा वापर गोदामासारखा करुन त्यात हत्यारे, जप्तीच्या वस्तु ठेवण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम बंदीवानांना सहन करण्याची वेळ आली.

दोन्ही मजल्यावर प्रत्येकी चार कोठड्यांची रचना असलेल्या शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येक कोठडीत 14 बंदीवानांना ठेवण्याची क्षमता आहे. त्यातील एक कोठडी महिला बंदीवानांसाठी तर उर्वरीत तीन कोठड्या पुरुष बंदीवानांसाठी वापरल्या जातात. नियमानुसार या तीनही कोठड्यात मिळून केवळ 42 बंदीवानांना ठेवता येवू शकते. प्रत्यक्षात मात्र येथील परिस्थिती उलट आहे. या चारपैकी एका कोठडीत आठ महिला बंदीवान असून त्यातील सहा महिला पोलीस कोठडीतील तर दोघी न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरीत तीन कोठड्यांचा तर अक्षरशः खुराडा झाला असून त्यात तब्बल 66 पुरुष बंदीवानांना कोंबण्यात आले आहे. सध्या कारागृहात असलेल्या पुरुष बंदीवानांपैकी अवघे सहाजण पोलीस कोठडीतील तर उर्वरीत 60 जण न्यायालयीन कोठडीतील आहेत. सध्या गजाआड असलेल्या या बंदीवानांची संख्या लक्षात घेता संगमनेरात पकडले गेलेले आरोपी कोणत्या स्थितीत दिवस काढीत असतील याचा सहज अंदाज येतो.

कोणतीही इमारत असो अथवा प्रकल्प त्याची निर्मिती करताना पुढील काही दशकांचा विचार करुनच ती निर्मिली जातात. शहर पोलीस ठाणे मात्र त्याला अपवाद ठरले आहे. सुमारे पाच लाखांहून अधिक लोकवस्तीच्या संगमनेर तालुक्यात चार पोलीस ठाणी आहेत. या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंदीवानांना शहर पोलीस ठाण्याच्या कोठड्यांमध्येच ठेवले जाते. त्यामुळे पूर्वीपासूनच शहर पोलीस ठाण्याची अवस्था आज आहे तशीच होती. नवीन इमारत मिळूनही बंदीवानांची समस्या तशीच राहिल्याने सदरची इमारत बांधताना दूरच्या विचारांचा अभावच असल्याचेही यातून समोर आले आहे.

