अमरधामच्या नूतनीकरण कामात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप! निकृष्ट दर्जाचे काम; निविदा प्रक्रीयेच्या चौकशीसह ठेकेदारावर कारवाईची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

गेल्या काही दिवसांपासून पुणे नाक्याजवळील हिंदू स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी पालिकेने 63 लाख रुपयांची निविदा काढली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार काम न करता अत्यंत हलके आणि कामचलाऊ साहित्य वापरले असून वर्षभरातच नव्याने काम करण्यात आलेल्या शेड्स गळू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे अन्य कामातही गुणवत्ता धाब्यावर बसविण्यात आली असून या कामातून ठेकेदार आणि पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी संगनमत करुन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय बेल्हेकर यांनी केला आहे

संगमनेर नगरपालिकेच्यावतीने सध्या शहरातील विविध ठिकाणी सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत. त्यात संगमनेरकर हिंदू धर्मियांसाठी एकमेव असलेल्या पुणे नाक्याजवळील हिंदू स्मशानभूमीचेही (अमरधाम) नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने 63 लाख रुपयांची निविदा काढली होती. प्रत्यक्षात मात्र सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने संपूर्ण कामाचा दर्जा सुमार ठेवल्याचे बेल्हेकर यांचे म्हणणे आहे. ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार कोणतेही काम केलेले नसून सदरचे काम करताना सुमार दर्जाचे बांधकाम साहित्य वापरण्यात आले आहे. तसेच शेड्स उभारताना अंदाजपत्रकानुसार नव्याने लोखंडी पाईप बसविणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराने जून्याच पाईप्सला रंग मारुन त्याचा वापर केला आहे.

पंधरा वर्षांपूर्वी याच ठिकाणाचे नूतनीकरण करुन सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा 63 लाख रुपयांची निविदा काढून खासगी ठेकेदारामार्फत अमरधामच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. अंत्यविधी पूर्वी मृतकाच्या नातेवाईकांना अंघोळ करावी लागते, त्यासाठी पंधरा वर्षांपूर्वीच येथे न्हाणीगृह बांधले गेले होते. याठिकाणी 24 तास पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी सदरच्या न्हानीगृहावर पाण्यासाठी टाकीही बांधण्यात आली आहे. मात्र त्या टाकीला अनेक ठिकाणी गळती लागलेली असतानाही नूतनीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. न्हाणीगृहात बसविण्यात आलेल्या फरशाही (स्टाईल्स) अत्यंत कमी दर्जाच्या असून येथील कामकात पूर्ण होवून काही महिने झाले असतानाच त्यातील अनेक फरशा गळून पडल्या आहेत. सदर ठेकेदारासोबतची निविदा प्रक्रियाही नियम डावलून केल्याचा आरोप विजय बेल्हेकर यांनी केला आहे. सदरचा करारनामा गेली दोन वर्ष कोरा होता, मात्र ज्यावेळी आपण माहिती अधिकारात त्याबाबतची माहिती मागविली त्यावेळी बांधकाम खातेप्रमुखांची बदली झालेली असल्याने नियमबाह्य पद्धतीने त्यावर मुख्याधिकार्‍यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे आपणास प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचे काम 2021 साली सुरू होवून 2020 साली पूर्ण झाल्याची अजब माहिती पालिकेने दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. अमरधामच्या वाढीव कामाला कोणतीही मंजूरी नसतांना पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकार्‍यांकडून वाढीव बिलं काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करीत अशा कोणत्याही स्वरुपाची वाढीव रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात येवू नये तसेच अमरधामच्या नूतनीकरण कामाची व त्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रीयेची सखोल चौकशी करुन संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागातील अधिकार्‍यांवर कारवाई करावी अन्यथा आपण न्यायालयीन मार्गाने न्याय मिळवू असा इशाराही माहिती अधिकार कार्यकर्ते विजय बेल्हेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *