आदिवासींमध्ये घुसखोरी करुन वैद्यकीय शाखेत प्रवेश अकोले पोलिसांत हिंगोली जिल्ह्यातील नऊ जणांवर गुन्हा

नायक वृत्तसेवा, अकोले
खोट्या दाखल्याच्या मदतीने दस्तऐवज तयार करून आदिवासी समाजात घुसखोरी करीत शासकीय वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवणार्या हिंगोली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील नऊ व्यक्तींवर अकोले पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 27) गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर जमातीतील आडनावाचा आधार घेऊन आदिवासींमध्ये घुसखोरी करून आदिवासींच्या योजनांवर डल्ला मारणार्या बोगस आदिवासींची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी राज्यातील आदिवासी संघटनांनी केली आहे.

बोगस आदिवासी दाखला मिळवणार्या लक्ष्मण शंकर कदम (रा. आंबा, ता. वसमत, जि. हिंगोली) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांचे अनुसूचित जमातीचे दाखले संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी रद्द करीत 15 जून, 2022 रोजी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे सूचित केले होते. मात्र गुन्हा दाखल होत नव्हता. आदिवासी संघटना व आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर 22 जुलै रोजी अकोले पोलीस ठाण्यात वैभव लक्ष्मण पथवे, जगदीश शंकर पथवे, लक्ष्मण शंकर पथवे, शंकर बाबा पथवे, श्रीकांत जगदीश पथवे, सुमंत जगदीश पथवे, द्वारका शंकर पथवे, संतोष शंकर पथवे व चेतन संतोष पथवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील लक्ष्मण शंकर कदम या शिक्षकाने चक्क खापर पणजोबा व काही बनावट नातेवाईक अकोल्यातून चोरले असल्याचे उघड झाले आहे. अकोले तहसीलमधून नऊ व्यक्तींचे आदिवासी ठाकर जमातीचे दाखले खाडाखोड करून मिळवले होते. खोटी वंशावळ तयार करून खोटे सत्य प्रतिज्ञापत्र अकोले तहसीलमध्ये बनवले गेले. याबाबत जात पडताळणी समितीच्या संशोधन पथकाने सर्व पुरावे शोधून काढले होते.

लक्ष्मण कदम याने स्वतःचा भाऊ सेतूचालक जगदीश कदम यांच्या मदतीने राहुरी येथील पारधी आडनावाच्या आदिवासी व्यक्तीला हाताशी धरून राहुरी येथील रहिवासी असल्याचे खोटे दाखले व शपथपत्र बनवले. तसेच चक्क नावात बदल करून गॅजेटमध्ये नोंद करून घेतली. त्यामुळे लक्ष्मण शंकर कदमचा लक्ष्मण शंकर पथवे झाला. आदिवासी आडनाव लावून घेतले की जमात पडताळणी समिती सहज फसतील या हेतूने बनावट दस्तऐवज जोडून गॅजेटमध्ये बदल करून घेतले. अकोले तालुक्यात अफ्रोट अकोले, आदिवासी ठाकर उन्नती मंडळ, आदिवासी ठाकर नोकरवर्ग व ठाकर समाज उत्कर्ष संस्थेच्या सतर्क कार्यकर्त्यांनी वेळेत पाठपुरावा केल्याने ही बनवेगिरी उघड झाली आहे.
