पुरस्कार हा शिक्षकांना प्रेरणा देणारा ः नागणे संगमनेर पंचायत समितीतर्फे गुणवंतांचा गौरव


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणार्‍या व समर्पित वृत्तीने समाज घडविणार्‍या शिक्षकांना दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार हा त्यांना प्रेरणा देणारा व जबाबदारी वाढविणारा आहे, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवार पुणेच्या संचालिका रोहिणी गुट्टे (नागणे) यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती संगमनेरतर्फे आयोजित विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा संगमनेर महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे उपस्थित होत्या. जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीला धुमाळ, वृषाली कडलग व अशोक शेटे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.

भाषणात रोहिणी गुट्टे पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची वृत्ती असते. स्वतःवर विश्वास ठेवला तर ते निश्चितच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी शिक्षकांनी समर्पित वृत्तीने कार्य करावे असे आवाहन केले. विद्यार्थी व शिक्षक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी प्रास्ताविकात शिक्षण विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.


यावेळी व्ही-स्कूल (वोपा) यामध्ये योगदान देऊन पंचायत समितीचे नाव राज्यभरात पोहोचवणार्‍या तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच खांडगाव शाळेतील सायली विठ्ठल खरे, दिव्यांग असूनही दहावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल बिरोबा विद्यालय रहिमपूरची श्रावणी बाबासाहेब वाळुंज, दिव्यांग शिष्यवृत्तीधारक झालेला श्रमशक्ती मालदाड विद्यालयाचा विद्यार्थी भालेराव वेदांत भीमराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख आंबेडकर, दशरथ धादवड, साखरे मॅडम, भागवत मॅडम, केंद्रप्रमुख प्रभाकर रोकडे, अशोक गोसावी, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजू रहाणे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सुनील ढेंरगे, आदर्श शिक्षक विलास आवारी, गोरक्षनाथ भोकनळ, अश्विनी मेहेर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी मंदा दुर्गुडे, विशेषतज्ज्ञ योगेश मोरे, महेश काळे, वैशाली गुंजाळ, संगीता गायकवाड, सुजाता वाघ, दत्ता लेंडाळ, संदीप कवडे, महेश मोहिते, विषयतज्ज्ञ नंदू रकटे, गंगाधर टेंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. परिचय सुनील घुले यांनी करून दिला. सूत्रसंचालन सोमनाथ घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगंबर फटांगरे यांनी केले.

Visits: 122 Today: 1 Total: 1114943

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *