सावित्रीच्या लेकी गिरवताहेत ग्रामसचिवालयात ज्ञानाची धडे इतारत मोजतेय शेवटच्या घटका; विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची भीती

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील सर्वात मोठे शहर व प्रस्तावित असलेला तालुका म्हणून राजूरची ओळख आहे. तीन माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, वरिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा, आय. टी. आय. कॉलेज या सर्व धबाडक्यात जिल्हा परिषदेची शाळा देखील प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानार्जनाचा प्रवास करत आहे. मुलांची पाचवी ते सातवीपर्यंत शाळेत 149 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना सहा वर्ग खोल्या आहेत. मात्र मुलींच्या पहिली ते पाचवीपर्यंत 145 मुली असून त्यांच्या वर्गखोल्या धोकादायक झाल्याने जून 2021 मध्ये निर्लेखन केल्याने तसेच निधी उपलब्ध नसल्याने इमारती शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे सावित्रीच्या 145 लेकी ग्रामसचिवालयात ज्ञानाची धडे घेत आहेत.

या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत, इमारत गळकी आहे. चहूबाजूंनी गटारी वाहत आहे. डासांचे साम्राज्य, पाऊस सुरू असल्याने चिखलाची दलदल आहे. तर समोरच एका घरात अवैध दारूविक्री होत असून परिसरात होणारी मद्यपींच्या वर्दळीमुळे शिक्षकही त्यात दोन शिक्षक दिव्यांग असूनही ते विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी या शाळा इमारतीबाबत उदासीन असल्याचेच चित्र समोर आले आहे. तर जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी, आदिवासी विभाग यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी असमर्थ ठरताहेत का असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग नसल्याने काही पालक इंग्रजी शाळेत आपले मुले दाखल करण्यासाठी दाखल्याची मागणी करत आहेत. एकीकडे मराठी शाळेतच आपली मुले शिकवा म्हणणारे नेते मराठी शाळा सुंदर, चकाचक बनविण्यासाठी निधी देत नसल्याने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. शालेय समितीने नवीन इमारतीचे बांधकाम करावे अशी मागणी केली तर शिक्षण विभागाने याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक होते ते त्यात कमी पडल्याचे दिसून येत आहे. अशी स्थिती निर्माण झाली तर विद्यार्थ्यांची संख्या रोडावेल अशी भीती शिक्षकांच्या मनात आहे.

एक वर्षापूर्वी निर्लेखन झालं आहे, मात्र अद्याप मंजुरी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्याची येण्या-जाण्याची अडचण आहे. मुलींची शाळा असून 1 ते 5 वर्ग आहेत. मात्र चिखलाची दलदल जिल्हा परिषदेची जुनी इमारत दुरुस्ती आवश्यक असताना ती अद्याप दुरुस्त नाही. निधी नसल्याने वाढीव निधीची फेरनिविदा टाकली आहे. 5 शिक्षक व 4 महिला शिक्षिका असून 145 विद्यार्थी आहेत अशी शाळेची सद्यस्थिती आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांनी दिलेल्या मान्यतेनुसार राजूर जिल्हा परिषद शाळेचे (मुली) एक वर्षापूर्वीच निर्लेखन मंजूर झाले आहे.
– सविता कचरे (विस्तार अधिकारी)
