सोनईचे तत्कालीन पोलीस निरीक्षकासह चार कर्मचारी निलंबित दोन युवकांना मारहाण केल्याचे प्रकरण; पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई

नायक वृत्तसेवा, सोनई
नेवासा तालुक्यातील सोनई येथील दोन युवकांना मारहाण केल्याप्रकरणी सोनईचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांच्यासह फौजदार, सहायक फौजदार व अन्य एकास निलंबित करण्यात आले आहे.

गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते व सोनई येथील तुषार देव्हारे या दोन युवकांना 15 एप्रिल, 2022 रोजी घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 17 एप्रिल रोजी अजय मोहिते यांनी पोलिसांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दिली होती. 23 एप्रिल, 2022 रोजी सातशेहून अधिक युवकांनी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हलगर्जीपणाचे वर्तन व पुढील चौकशीत हस्तक्षेप आणि साक्षीदारावर दबाव टाकू नये, यासाठी बागूल, फौजदार उमेश पतंगे, सहायक फौजदार संजय चव्हाण व अनिल जाधव या चौघांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी दिली. गणेशवाडीतील युवकांना मारहाण केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. मोठ्या संख्येने जनसमुदाय पोलीस ठाण्यात जमला होता. यावेळी हे प्रकरण जिल्हाभर गाजले होते. या प्रकरणाची दखल पोलीस अधीक्षकांनी घेत कारवाई केली आहे.

Visits: 197 Today: 3 Total: 2163256

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *