पांजरेतील वृद्ध शेतकर्‍याने दिव्यांग मुलीसाठी साकारला धबधबा ‘वैशाली धबधबा’ नाव देवून व्यक्त केले कन्याप्रेम; पर्यटक देताहेत भेट


नायक वृत्तसेवा, अकोले
आपली दिव्यांग मुलगी वैशाली हिच्या नावे आदिवासी ठाकर समाजाच्या लक्ष्मण सयाजी उघडे या वृध्द शेतकर्‍याने आपल्याच शेतातील सत्तरी ओलांडणार्‍या धबधब्याचे नाव ‘वैशाली धबधबा’ ठेवून लाखो पर्यटकांना आकर्षित केले आहे.

भंडारदरा जलाशय पाहिल्यानंतर पर्यटकांची पावले आदिवासीबहुल पांजरे गावाकडे वळतात. भंडारदर्‍याकडून घाटघर येथे जाणार्‍या रस्त्यावर 150 लोकवस्तीचे पांजरे हे गाव आहे. येथील पोलीस पाटील लक्ष्मण सयाजी उघडे यांनी आपल्या शेतात सत्तर वर्षांपूर्वीचा ओढा पक्क्या दगडाने बांधून घेतला आहे. त्यासाठी कोणतीही सरकारी मदत नाही की सावकारी कर्ज घेतले नाही. जंगलातील दगड आणून ती योग्य पद्धतीने लावून तज्ज्ञ अभियंता काय काम करेल असे काम करून त्यांच्या शेतातून वाहणार्‍या ओढ्याचे रूपांतर धबधब्यात झाले आहे. हा धबधबा नायगारा धबधब्याची अनुभूती देत आहे. याकामी कुटुंबातील सदस्यांची मदत झाली.

वैशाली व रोहिणी या दोन मुली त्यात वैशाली दिव्यांग आहे. मात्र तिच्यावर लक्ष्मण उघडे यांचे जीवापाड प्रेम असल्याने त्यांनी आपल्या शेतातील ओढा बांधून त्यातून तयार होणार्‍या धबधब्याला ‘वैशाली धबधबा’ असे नाव देऊन पर्यटकांना आकर्षित केले आहे. नायगारासारखा निसर्गनिर्मित हा धबधबा अवतीर्ण झाला असल्याने वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, अमोल आडे यांनी हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना कच्चा रस्ता तयार करून दिला असला तरी पक्का रस्ता झाल्यास लाखो पर्यटक, निसर्गप्रेमी याचा आस्वाद घेत आपला आनंद द्विगुणित करतील.

माझ्या आजोबा-पंजोबाने शेतातील ओढा बांधला. मी हा ओढा हळूहळू उंचावत नेला, त्यातून धबधबा तयार झाला असून पक्का बांध बांधल्याने त्यातून निर्माण होणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. या धबधब्याला माझी मुलगी वैशाली हिचे नाव मी दिले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात, याचा मला आनंद असून हे पाणी जलसंपदा विभागाने अडविले तर या भागातील शेतीला व पिण्यास पाणी उपलब्ध होईल. त्यासाठी सरकारने या प्रकलपाचा विचार करावा.
– लक्ष्मण उघडे (शेतकरी, पांजरे)

Visits: 96 Today: 1 Total: 437054

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *