डॉ.गिरीष सावंत यांच्या घरातून अर्धा किलो दागिन्यांची चोरी! संगमनेरात चोरट्यांची दहशत; गॅलरीतून घरात प्रवेश करीत डाव साधला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.गिरीष सावंत यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी डाव साधून तब्बल 526 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांवविले आहेत. गेल्या शनिवारपासून सावंत दाम्पत्य बाहेरगावी गेले होते, बुधवारी सायंकाळी ते संगमनेरात परतल्यानंतर सदरचा प्रकार उघड झाला. याबाबत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर वस्तीत घडलेल्या या घटनेने शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी होत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरीचा प्रकार डॉ.गिरीष सावंत यांच्या ताजणे मळ्यातील साईसुमन रुग्णालयावरील घरात घडला. गेल्या शनिवारीपासून (ता.2) सावंत दाम्पत्य बाहेरगावी गेलेले होते. या दरम्यान रुग्णालय सुरु असले तरीही त्यांच्या राहत्या घराला मात्र कुलुप होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घराच्या गॅलरीतून घरात प्रवेश केला आणि मनसोक्त उचकापाचक करीत कपाटात ठेवलेले विविध आकार, प्रकार आणि एकूण 526 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.
बुधवारी (ता.6) डॉ.सावंत उशिराने संगमनेरात पोहोचल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे सोपविला आहे.