सरत्या वर्षात पठारभागावर गुन्हेगारांचेच वर्चस्व…! अपवाद वगळता बहुतेक घटनांचे तपास अद्यापही प्रलंबित

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांमध्ये सरत्या वर्षात (2020) मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असल्याचे अधोरेखित होत आहे. खून, बलात्कार, विनयभंग, घरफोड्या आदी मोठ्या गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये विशेषकरुन वर्षभरात महामार्गांच्या दुरावस्थेमुळे छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये नऊ जणांना नाहक जीव गमवावे लागले आहेत. तर वाळूतस्करीवर नियंत्रण मिळविण्यात पूर्णतः अपयश आल्याचेही सिद्ध होत आहे.

पुणे-नाशिक या दोन्ही महानगरांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या केंद्रस्थानी घारगाव येथे मुळा नदीच्या कडेला पोलीस ठाणे वसलेले आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 46 गावांचा समावेश आहे. त्याचबरोबर वाड्यांचाही मोठा समावेश आहे. पोलीस ठाण्यापासून काही हाकेच्या अनेक गावे येतात. तर काही कोसो मैल दूर आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी (2020) गुन्ह्यांच्या संखेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत नऊ घरफोड्या तर इतर लहान-मोठ्या सोळा चोर्‍या झालेल्या आहेत. यापैकी फक्त दोन चोर्‍यांचाच शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित चोर्‍यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. वर्षभरात अठरा दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या आहेत. यामध्ये एका कारचाही समावेश आहे. पैकी पाच दुचाकींचा शोध लागला आहे. इतर दुचाकींचा व कारचा अद्यापही पोलिसांना शोध घेता आलेला नाही.

महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये आत्तापर्यंत नऊ जणांना आपले जीव गमवावे लागले तर अनेकजण जखमी झाले आहेत. खुनाचा प्रयत्न करणे यानुसार एकूण सात गुन्हे दाखल झालेले आहे. यामध्ये शेतीचेही वाद आहेत. एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. मात्र, त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळालेले. याचबरोबर विनयभंगाचे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत. तर अत्याचाराचे पाच गुन्हे आहेत.

तत्कालीन पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. यावरुन अपेक्षेप्रमाणे त्यांना कार्यकाल पूर्ण करता आला नसल्याचा सूर नागरिकांतून उमटला आहे. आता संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याची धुरा सांभाळलेले सुनील पाटील यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. त्यातच अपुरे संख्याबळ असल्याने पोलीस निरीक्षक पाटील यांना पठारभागातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून भौगोलिकदृष्ट्याही नियंत्रण ठेवण्यास अवघड आहे. याबाबत अनेकदा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे घारगाव पोलीस ठाण्याला संख्याबळ वाढवून देण्याची मागणी केलेली आहे. परंतु, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यावरुन संपूर्ण सरत्या वर्षात गुन्हेगारांचाच बोलबाला राहिला असल्याचे अधोरेखित होत आहे.


पठारभागातून मुळा व कच नदी वाहत असून राजरोसपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. परंतु, पोलिसांच्या मिलीभगतमुळे पूर्णतः अवैध वाळू उपसा रोखण्यात यश मिळालेले नाही. अनेकदा हाणामारी व शासकीय कर्मचार्‍यांवर हल्ले झाल्याचेही प्रकार घडलेले आहेत. यावरुन, पोलिसांचा वचक नसून, वाळूतस्करांचेच नदी पात्रावर वर्चस्व असल्याचे सिद्ध होत आहे.

Visits: 222 Today: 2 Total: 403937

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *