भंडारदरा जलाशयाचे आता ‘क्रांतीवीर राघोजी भांगरे’ नामकरण! जागतिक आदिवासी क्रांती दिनाचे औचित्य साधून होणार नामकरण
नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघटनांनी एकत्र येत भंडारदरा येथील विल्सन जलाशयाचे नाव आता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रेरणेने येत्या सोमवारी (ता.9) क्रांती दिनी हा कार्यक्रम पार पडणार असून याबाबतची माहिती आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे यांनी दिली. मात्र या नव्या नावाबाबत सध्या नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा आदिवासी विकास परिषदेचे राज्याध्यक्ष आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरा जलाशयावर हजारो तरुण एकत्र येऊन विल्सन जलाशयाला ‘क्रांतीवीर राघोजी भांगरे’ हे नाव देणार आहे. याबाबत राज्य व केंद्र सरकारला पत्रव्यवहार केल्याचे संयोजकांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना पिचड म्हणाले की, जल, जंगल, जमीन हे आदिवासी समाजाचे हक्काचे असून आद्यक्रांतीची मशाल ज्यांनी पेटविली आणि सर्वसामान्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच होणारे शोषण थांबविण्यासाठी ज्यांनी मोठा लढा उभारला अशा आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांचे नाव विल्सन डॅमला देण्यात येणार आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी विल्सन डॅमचे ‘आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे धरण’ असे नामकरण होत आहे.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पिचड पिता-पुत्रांनी भंडारदरा धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नाव देण्यासंदर्भात 9 ऑगस्टला भंडारदरा धरण येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा ह्या गोष्टी होण अपेक्षित होत्या. परंतु, त्यावेळी त्यांच्याकडून ते झाले नाही आणि आज त्यांच्याकडे सत्ता नसल्याने ते सैरभैर झाले असून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजापुढे भावनिक मुद्दा करून एक प्रकारची नौटंकी करत असून या जलाशयाला नाव देणे म्हणजे पिचड पिता-पुत्रांना उशिरा सूचलेले शहाणपण आहे.
– मारुती मेंगाळ (माजी उपसभापती, अकोले)
माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भंडारदरा धरणास आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे धरण असा नामकरणाचा कार्यक्रम सोमवारी (9 ऑगस्ट) आयोजित केला आहे याचा आम्हांला मनापासून आनंद होतोय. त्यास आमचा जाहीर पाठिंबा आहे .ती आमची जुनीच मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हीच मागणी करत होतो. मात्र पिचडांकडे अनेक वर्षे मंत्रीपद असताना त्यांनी याकडे कधी लक्ष दिले नाही, आता त्यांचा हा पुळका म्हणजे पुतण्या मावशीचे प्रेम आहे.
– अशोक भांगरे (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, अकोले)