मुळा धरणाच्या पाण्यात नगरमधील पर्यटक बुडाला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला मृतदेह

नायक वृत्तसेवा, राहुरी
मुळा धरणातील अथांग जलसागर व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी रविवारी (ता.17) सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी गर्दी केली. परंतु, त्यांच्या आनंदावर विरजण पडले. दुपारी धरणाच्या पाण्यात उतरलेला अहमदनगर शहरातील एक पर्यटक बुडाला. स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी साडेपाच वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. चेतन कैलास क्षीरसागर (वय 38, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर) असे मृताचे नाव आहे.

मृत चेतन समवेत त्याचे मित्र बाळकृष्ण धारुणकर, सोमनाथ देवकर, बाळासाहेब शिंदे, संतोष मेहत्रे, निलेश धारुणकर, बाळासाहेब जुंदरे, संदीप शिंदे, आशुतोष भागवत, राजेंद्र करपे, योगेश पतले, नितीन फल्ले, मिलिंद शिरसागर (सर्वजण रा. अहमदनगर) असा 13 जणांचा गट धरणावर पर्यटनासाठी आला होता. धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकी जवळून आत जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे, जलसंपदाच्या कर्मचारी वसाहतीमधील रस्त्याने सर्वजण चमेली विश्रामगृहाजवळ गेले. तेथील समोरील पटांगणात सर्वांनी आपल्या समवेत आणलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला.

त्यानंर सायंकाळी चार वाजता चमेली विश्रामगृहाच्या मागील बाजूस धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी काहीजण उतरले. काहीजण काठावर बसले. याठिकाणी प्रत्येक वर्षी पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेथील खोल पाण्यात उतरलेला चेतन क्षीरसागर दमछाक होऊन पाण्यात बुडाला. मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस नाईक गणेश सानप यांनी सायंकाळी साडेपाच वाजता स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी राहुरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धोक्याच्या फलकाची गरज..!
मुळा धरणावरील चमेली विश्रामगृहाच्या मागील बाजूस प्रत्येक वर्षी पर्यटक बुडण्याच्या घटना घडत आहेत. याठिकाणी जलसंपदा खात्याने सुट्टीच्या दिवशी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून, पर्यटकांना धोक्याची सूचना देण्यासाठी मोठे फलक लावण्याची गरज आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 117271

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *