आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधम बापाला दहा वर्षांचा कारावास! संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा; चार वर्षांपूर्वी दारुच्या नशेत केला होता बलात्कार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
चार वर्षांपूर्वी अकोले तालुक्यातील शिरपूंजे येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चक्क तिच्या नराधम पित्यानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकारानंतर अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेच्या मदतीने पीडित मुलीसह तिच्या आई व भावांनी राजूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ‘त्या’ नराधम बापावर बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन आरोपीविरोधात संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल आज लागला असून अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश आर.आर.कदम यांनी आरोपी पित्याला दहा वर्षांच्या कारावासासह 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची हकिकत अशी की, अकोले तालुक्यातील शिरपूंजे येथे एक आदिवासी कुटुंब वास्तव्यास असून शेतमजूरी करणार्या पती-पत्नीला इयत्ता नववीत शिकणारी 15 वर्षीय मुलगी व दोन मुले आहेत. यातील पीडित मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन असल्याने ते नेहमीच नशेत तर्रर असत. 2016 पर्यंत आश्रमशाळेत शिक्षण घेणारी सदर पीडिता त्यानंतर घरीच असत. 2017 मध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात एके दिवशी सदर पीडितेचा बाप दारुच्या नशेत तर्रर होवून घरी आला. नेहमीप्रमाणे त्याने आपल्या कुटुंबासह आजुबाजूच्या लोकांना शिव्यांची लाखोळी वाहिल्यानंतर ‘त्या’ कुटुंबाने एकत्रित जेवणं केली व सर्वजण झोपी गेले.
मध्यरात्र उलटून गेल्यानंतर दारुच्या नशेत झिंगाट झालेल्या त्या नराधम पित्याच्या मनातील दानव जागा झाला आणि त्याने तडक आपल्या पोटच्या मुलीजवळ जावून तिच्याशी लगट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे झोपेतून जागा झालेला तो लहानसा जीव आपल्या जन्मदात्याच्या या कृत्याने भांबावला आणि तिने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र रग्गड असलेल्या त्या नराधमासमोर तिची ताकद क्षीण ठरली, यावेळी त्याने आपल्याच पोटच्या मुलीला दमबाजी करीत गप्प बसवले आणि बळजोरीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.
या प्रकाराने त्या छोट्याशा मुलीला प्रचंड वेदना होवू लागल्याने ती मुसमुस करुन रडू लागली. त्या आवाजाने जवळच झोपलेली तिची आई आणि दोन्ही भाऊ जागे झाले व ‘तु का रडतेस?’ अशी विचारणा करु लागले. त्यावर पीडितेने आपल्याच बापाने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगताच त्या तिघांचाही संताप झाला. मात्र दारुने त्या नराधमाच्या डोक्यात राक्षसी वृत्ती जागी केलेली असल्याने त्याने उलट दमबाजी व शिवीगाळ करीत त्या तिघांनाही गप्प केले. त्यावरही न थांबता ‘जर कोणी या प्रकाराबाबत कोठे काही बोलले तर एकेकाचा मुडदाच पाडील’ असा सज्जड दमही त्याने भरल्याने पीडितेसह ते संपूर्ण कुटुंबच हादरले.
या घटनेतून पीडिता गर्भवती राहीली, मात्र बापाच्या धाकाने घरातील कोणीही बाहेर काही बोलण्यास धजावत नसल्याने पीडितेच्या पोटातील गर्भ सात महिन्यांचा झाला. त्यामुळे तिला वेदना होवू लागल्याने अखेर तिच्या आई व भावांनी तिला एका खासगी डॉक्टरांकडे नेले व औषधोपचार घेतले. हा सगळा प्रकार संशयात्मक वाटल्याने संबंधित डॉक्टरांनी याबाबत त्यांना विश्वासात घेवून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता ते सगळेच घाबरले व तेथून निघून गेले. त्यामुळे संशय बळावलेल्या त्या डॉक्टरांनी अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेला घडला प्रकार कळविला.
या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच 12 फेब्रुवारी 2018 रोजी स्नेहालय संस्थेचे हर्षदा गोले, संतोष धर्माधिकारी व अखील पठाण हे तिघे पीडितेच्या घरी आले व त्यांनी त्या कुटुुंबाला धीर देत राजूर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी राजूर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. दोन दिवस तेथे उपचार घेतल्यानंतर 15 फेबु्रवारी 2018 रोजी सदर पीडिता आपल्या आईसह थेट राजूर पोलीस ठाण्यात पोहोचली व आपल्या नराधम पित्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर राजूरचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी व उपनिरीक्षक ए.एन.उजागरे यांनी त्या नराधमास गजाआड करीत घटनेचा बारकाईने तपास करुन संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश आर.आर.कदम यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करीत न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर करीत सतरा साक्षीदार तपासले. या खटल्यात पीडित मुलगी व तिची आई दोघेही फितूर झाले. मात्र या प्रकरणात पीडिता गर्भवती राहील्याने व अहमदनगर जिल्हा रुग्णलयातील तपासणीत पोटातील गर्भ तिच्या बापाचेच असल्याचेही स्पष्ट झाले. या दरम्यान 12 एप्रिल 2018 रोजी पीडितेने बाळाला जन्म दिला, मात्र बाळाची स्थिती गंभीर असल्याने 20 एप्रिलरोजी त्याचा मृत्यू झाला. पीडितेने बलात्काराची तक्रार दाखल केलेली असल्याने स.पो.नि.कादरी यांनी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून मयत बाळाच्या हाडाचे नमुने शाबीत इेवण्याची सूचना केली होती.
त्यानुसार रुग्णालयाने बाळाच्या पायाचे हाड सुरक्षित ठेवले होते, नाशिक येथील वैद्यक प्रयोगशाळेतील तपासणीत बाळाचा आणि पीडितेच्या बापाचा डिएनए जुळाल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यासर्व पुराव्यांसह सरकारी अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी उच्च न्यायालयातील विविध दाखले देत जोरदार युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश मंठणकर यांनी आरोपीला बलात्काराच्या प्रकरणात 10 वर्षांचा सश्रम कारावास व 15 हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावास, पोस्कोच्या कलम 4 अंतर्गत 10 वर्षांचा कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची कैद, कलम 5 (एन)सह 6 नुसार 10 वर्ष कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावास, कलम 5 (।)(॥) श्रस 6 नुसार 10 वर्ष कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली.
वरील सर्व शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्या आहेत. आरोपीला सुनावलेल्या 60 हजार रुपये दंडातील 40 हजार रुपये पीडितेला व 20 हजार रुपये सरकारात जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून बी.जी.कोल्हे यांनी कामकाज पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, पो.हे.कॉ.प्रवीण डावरे, चंद्रकांत तोर्वेकर, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी, दीपाली दवंगे व कोर्ट ऑर्डली सारीका डोंगरे यांनी सहाय्य केले.